
राजस्थानच्या भिलवाडा जिह्यात एका चोराने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुखवटा घालून मोबाईलचे दुकान फोडले. त्याने सुमारे 40 महागडे स्मार्टफोन चोरून पळ काढला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून मोदींचा मुखवटा घातलेल्या चोराचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये लाल रंगाचा शर्ट घातलेला चोर दिसतो. त्याने पंतप्रधान मोदींचा मुखवटा घातला होता. चोरटय़ाने एका अवजाराच्या सहाय्याने दुकानाचे शटर तोडले. त्याने चोरलेल्या मोबाईल्सची किंमत सुमारे 4 लाख रुपये एवढी असल्याचा अंदाज आहे. त्याने आणखी एक दुकान फोडण्याचा प्रयत्न केला. तो मात्र फसला. या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून चोराची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
































































