टीईटी पेपरफुटीप्रकरणी काँग्रेस आक्रमक, दादा भुसे यांच्या राजीनाम्यासाठी सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीईटी पेपरफुटीप्रकरणी युवक काँग्रेस आक्रमक झाली असून सलग तिसऱया दिवशी आंदोलन करून भाजपा महायुती सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करत शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राजीनामा देण्याच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली.

काँग्रेस पक्षाने पेपरफुटीप्रकरणी आक्रमक भूमिका घेत भाजपा सरकारला सळो की पळो करून सोडले आहे. सोमवारी रात्री काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयूआयने शिक्षणमंत्री दादा भुसे यांची गाडी अडवून काळे झेंडे दाखवले. त्याआधी रविवारी मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या सरकारी निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. आज पुन्हा युवक काँग्रेसने विधान भवनाबाहेर आंदोलन केले. शिक्षणमंत्री दादा भुसे यांचा राजीनामा घेतल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही, असा इशारा युवक काँग्रेसने दिला आहे.