नागरी सेवांबाबत मुंबईकरांच्या तक्रारी वाढल्या, प्रदूषणाच्या सर्वाधिक तक्रारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईकर नागरी समस्यांबाबत जागरूक झाले असून महापालिकेच्या  डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून तक्रारी नोंदवत आहेत. मुंबईतील नागरिकांच्या तक्रारींमध्ये 59 टक्क्यांची वाढ झाली आहे. यामध्ये पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, प्रदूषण यासंदर्भातील या तक्रारी सर्वाधिक आहेत. ‘प्रजा’ फाऊंडेशनने मुंबई महापालिकेच्या सहकार्याने ‘मुंबईतील नागरी सेवा, पर्यावरण व हवामान बदलाचे मुद्दे 2026’ या अहवालाचे आज प्रकाशन झाले. यामध्ये मुंबईतील नागरी सेवांची स्थिती, पर्यावरणीय कामगिरी आणि हवामान बदलाला सामोरे जाण्याच्या शहराच्या तयारीचे सर्वंकष मूल्यमापन करण्यात आले आहे.

2016 मध्ये असलेली 81,555 तक्रारींची संख्या 2025 मध्ये 1,30,066 वर पोहोचली  आहे. 2016 ते 2025 या कालावधीत पाणीपुरवठय़ाच्या तक्रारींमध्ये 96 टक्के आणि पर्जन्यवाहिन्यांच्या तक्रारींमध्ये 88 टक्के, प्रदूषणासंदर्भातील तक्रारींमध्ये सर्वाधिक म्हणजे 531 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याखालोखाल घनकचरा व्यवस्थापनासंदर्भातील तक्रारींमध्ये 281 टक्क्यांनी वाढ झाली.

मुंबईतून दररोज 6300 मेट्रिक टन कचरा डेपोवर पाठवला जात आहे. एकूण बल्क वेस्ट जनरेटर हाऊसिंग सोसायटींपैकी केवळ 13 टक्के सोसायटय़ा म्हणजेच 2749 पैकी 347 सोसायटय़ा कचऱयावर प्रक्रिया करतात. ‘बी’ आणि ‘एल’ वॉर्डमध्ये तर एकही सोसायटी कचऱयावर प्रक्रिया करत नाही, अशी माहिती ‘प्रजा’ फाऊंडेशनच्या अहवालात आहे.