
पिंपरी महापालिकेतील पाच महिन्यांच्या सत्ताकाळात विविध विषयांवर सत्ताधारी भाजपला माघार घेण्याची नामुष्की ओढवल्यानंतर आणि स्वपक्षातील नगरसेवकांनी चुकीच्या प्रस्तावांना विरोध केल्यानंतर भाजपच्या कोअर कमिटीने नगरसेवकांसाठी तुघलकी फतवा काढला आहे. पक्षाच्या किंवा चुकीच्या बाबींविरोधात जाहीर बोलायचे नाही, त्यांनी फक्त सूचना करायच्या. जाहीर बोलल्यास नगरसेवकांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा निर्णय झाल्याची माहिती सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सलग दुसऱ्यांदा एकहाती सत्ता आली. मात्र, सत्ता आल्यापासून महापालिकेतील पदाधिकाऱ्यांमध्ये सुप्त संघर्ष आणि त्यांच्यात ताळमेळ नसल्याचे वारंवार विविध बाबींतून दिसून आले. सत्ता येऊन पाच महिने झाल्यानंतरही सभागृहात एखादा विषय मंजूर करण्याचा ‘व्हिप’ असतानाही नगरसेवक विरोधाची उघड भूमिका घेत होते.
सर्वसाधारण सभेत अनेक विषयांबाबत पक्षविरोधी भूमिका घेतली होती. तसेच ६० कोटींच्या बोगस उपसूचनांप्रकरणी पदाधिकाऱ्यांमधील विसंवाद उघडकीस आला होता. चुकीच्या कारभारामुळे महापौर रवि लांडगे यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त करावी लागली होती. त्यामुळे पक्षातील दुफळी समोर आली होती. ही बाब ओळखून शहर भाजपच्या कोअर कमिटीची बैठकी झाली. या बैठकीत झालेल्या निर्णयांची सत्तारूढ पक्षनेते शितोळे यांनी आज माहिती दिली.
शितोळे म्हणाले, ‘संघटनात्मक संरचना आणि नागरिकांना अभिप्रेत असे काम करण्यासाठी काही कडक धोरणे राबवण्याचा निर्णय कमिटीने घेतला आहे. सभागृहात नगरसेवकांच्या विरोधी भूमिकेमुळे पक्षाची बदनामी झाली आहे. नगरसेवक प्रभागापुरते असतील; पण पक्षाने निर्णय प्रक्रियेतून धोरणात्मक भूमिका घेतलेली असते. त्यामुळे सभागृहात बोलताना कोणत्याही विषयाला फाटे फोडू नयेत. त्यावर सूचना कराव्यात; परंतु विरोधात बोलू नये. समाजमाध्यमांसह इतर कोणत्याही ठिकाणी पक्षविरोधी भूमिका घेऊ नये; अन्यथा योग्य वेळी कारवाई केली जाईल,’ असा इशाराही त्यांनी दिला.
स्वीकृत सदस्यांचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून होणार आहे. स्वीकृत सदस्य नियुक्तीचा प्रस्ताव दफ्तरी दाखल केला आहे. प्रस्ताव दफ्तरी दाखल केल्यानंतर त्याची प्रक्रिया असते. तीन महिने विषय पुन्हा आणता येत नाही. नियमाप्रमाणे स्वीकृत सदस्यांची नियुक्ती केली जाईल.
प्रशांत शितोळे, सत्तारूढ पक्षनेते, महापालिका
सर्वपक्षीय नगरसेवकांना प्रशिक्षण
महापालिकेत ६४ नगरसेवक हे पहिल्यांदाच निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना महापालिका सभागृहाच्या कामकाजाचा गंधही नाही. सभाशास्त्र, नियमांची माहिती नाही. त्यामुळे सर्वच नगरसेवकांना प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी होऊ लागली होती. त्याच अनुषंगाने मुंबई येथील ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’त १०, ११ आणि १२ जुलै रोजी सर्वपक्षीय नगरसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
१५ जुलैपर्यंत प्रभाग अध्यक्ष निवड
महापालिकेचे आठ प्रभाग होते. यांमध्ये भाजपने दोन नवीन प्रभागांची निर्मिती केली आहे. हे प्रभाग उद्या (बुधवार) पासून कार्यान्वित होणार आहेत. त्यामुळे रखडलेल्या प्रभाग अध्यक्षांची निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला असून, १५ जुलैपर्यंत प्रभाग अध्यक्षांची निवड घेतली जाणार आहे, अशी माहिती सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी दिली.




























































