राम मंदिर देणगी घोटाळा व अयोध्येमध्ये दडपशाही, काँग्रेस नेते अजय राय नजरकैदेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगी घोटाळ्यामुळे अडचणीत आलेल्या भाजप सरकारने आता दडपशाही सुरू केली आहे. या देणगी घोटाळ्याच्या विरोधातील संभाव्य आंदोलन मोडून काढण्यासाठी योगी आदित्यनाथ सरकारने आज पोलिसांचा वापर केला. प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी अयोध्येत पोहोचलेले काँग्रेस नेते अजय राय यांना त्यांच्या कार्यकर्त्यांसह नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.

राम मंदिरातील देणगी चोरीचे प्रकरण सध्या देशभरात गाजत असून, यामुळे रामभक्त आणि जनतेमध्ये संतापाची लाट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या विषयावर मौन बाळगले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असला तरी त्यात केवळ छोट्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत; मंदिराचा कारभार पाहणारे चंपत राय व इतर विश्वस्तांची नावे एफआयआरमधून (FIR) वगळण्यात आली आहेत. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

उत्तर प्रदेशात हे प्रकरण कमालीचे तापले आहे. “आरएसएस आणि भाजपशी संबंधित लोकांनी देणगी चोरी करून पवित्र राम मंदिराची बदनामी केली आहे,” असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. याचा निषेध म्हणून काँग्रेसचे यूपी प्रदेशाध्यक्ष अजय राय हे कार्यकर्त्यांसह राम मंदिरात दर्शनासाठी निघाले होते. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या कार्यालयाला घेराव घालण्याचीही तयारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली होती, मात्र मंदिरात पोहोचण्याआधीच सोमवारी मध्यरात्री पोलिसांनी त्यांना रोखले आणि आचार्य नरेंद्र देव विद्यापीठाच्या विश्रामगृहात नजरकैदेत ठेवले.

‘दर्शन घेतल्याशिवाय अयोध्या सोडणार नाही!’

अजय राय यांनी पोलिसांच्या या कारवाईचा तीव्र निषेध केला. राय यांनी ठणकावून सांगितले की, “आम्ही रामाच्या दर्शनासाठी आलो होतो आणि हॉटेलमध्ये थांबलो होतो. तिथून जबरदस्तीने आम्हाला उचलण्यात आले व विद्यापीठाच्या अतिथीगृहात आणून ठेवण्यात आले. आमचा छळ केला जात आहे, साधं नाश्ताही करू दिला जात नाहीये. चार दिवसांपूर्वीही आमच्यासोबत हाच प्रकार घडला होता, ज्यामुळे आम्हाला बाहेरूनच दर्शन घ्यावे लागले. आता तर आम्हाला नजरकैदेत ठेवण्यात आले आहे; मात्र आम्ही प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतल्याशिवाय अयोध्या सोडणार नाही!”