
शिक्षक दिसले की पाचावर धारण बसण्याचे दिवस आता गेले. आता शिक्षकांनाच विद्यार्थ्यांपासून जीव वाचवण्याची वेळ आली आहे. शाळेत टीसी घेण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने दोन वर्षांपूर्वी नापास झाल्याचा राग मनात धरून शिक्षकाला चाकूने भोसकले. विशेष म्हणजे शिक्षकाला मारण्यासाठी त्याने ऑनलाईन चाकू मागवला होता.
छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी भागात असलेल्या नामांकित लिटल फ्लॉवर या शाळेत मंगळवारी सकाळी हा थरार घडला. टीसी घेण्यासाठी एक विद्यार्थी शाळेत आला आणि थेट मुख्याध्यापिका स्वर्णलता मेनेकांती यांच्या दालनात पोहोचला. तेथे त्याचे माजी वर्गशिक्षक विशाल धूशिंग हेही होते. टीसीच्या मागणीवरून सुरुवातीला शाब्दिक चकमक उडाली. मेनेकांती यांनी त्याला अर्ज आणि शूल्क भरण्यास सांगितले. मात्र त्याने त्यास नकार दिला. त्यामुळे हा वाद अर्धा तास धुमसत राहिला. मुख्याध्यापिका आणि विशाल धूशिंग या दोघांनीही त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
समजावून सांगण्याचाही उपयोग होत नसल्यामुळे विशाल धूशिंग हे मुख्याध्यापिकेच्या दालनातून बाहेर पडत असतानाच त्या विद्यार्थ्याने त्यांच्या पोटात चाकू खुपसला. रक्तबंबाळ अवस्थेत विशाल धूशिंग हे खाली पडले. त्यांना वाचवण्यासाठी इतर शिक्षक धावले. त्यांनाही या विद्यार्थ्याने चाकू दाखवून धमकावले. गंभीर अवस्थेत विशाल धूशिंग यांना रुग्णालयात हलवण्यात आले. धूशिंग यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.
शाळेत टीसी घेण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने दोन वर्षांपूर्वी नापास झाल्याचा राग मनात धरून शिक्षकाला चाकूने भोसकले. pic.twitter.com/jgcX0pzcCH
— Saamana Online (@SaamanaOnline) July 1, 2026
या थराराची माहिती मिळताच पोलिसांनी शाळेत धाव घेतली. त्या अल्पवयीन विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चौकशीत समोर आलेली माहिती ऐकून पोलीसही थक्क झाले. २०२३ मध्ये हा विद्यार्थी लिटल फ्लॉवर शाळेत नववीत शिकत होता. त्याचे वर्गशिक्षक होते विशाल धूशिंग. नववीत तो विज्ञान आणि गणितात नापास झाला. धूशिंग यांनीच आपल्याला नापास केले असा त्याचा समज होता. मात्र, धूशिंगने मराठी आणि हिंदी विषय शिकवत असल्याने त्याचा नापास करण्याचा काहीही संबंध नव्हता. परंतु तेव्हाही त्याचा धूशिंग यांच्याशी वाद झाला होता. आज टीसी घेण्यासाठी आल्यानंतर त्याचा राग उफाळून आला. धूशिंग यांना धडा शिकवण्याच्या इराद्यानेच तो शाळेत आला होता. त्यासाठी त्याने ऑनलाईन चाकूही मागवला होता, अशी माहितीही तपासात समोर आली.
आयसीयूमध्ये उपचार सुरू
शिक्षक विशाल धूशिंग यांच्यावर झालेल्या चाकूहल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले असून, ट्रामा आयसीयू (अतिदक्षता) विभागात उपचार सुरू आहे. धारदार चाकू पोटात भोसकल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली सर्जरी विभागाअंतर्गत ते उपचार घेत आहेत.





























































