चेंबूरमध्ये भयंकर दुर्घटना; शाळेच्या बसवर झाड कोसळले, एका विद्यार्थ्याचा मृत्यू! 4 जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत पावसाने जोर धरला असतानाच आज चेंबूर येथे शाळेच्या बसवर भलेमोठे झाड कोसळून भयंकर दुर्घटना घडली.  शाळा सुटल्यावर मुले बसमधून घरी जायला निघाली होती. वाटेत पिंपळाचे जुने झाड उन्मळून बसवर पडले आणि बसचा चक्काचूर झाला. मुले झाडाखाली दबली गेली. काही वेळापूर्वी हसतखेळत घरी निघालेली मुले अचानक झालेल्या आघाताने  भेदरली,  किंचाळू लागली. या दुर्घटनेत 11 वर्षीय विहान श्रीवास्तवर या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर चार मुले गंभीर जखमी झाली. या घटनेने हळहळ व्यक्त होत असून या धोकादायक झाडाबद्दल तक्रार करूनही दुर्लक्ष करणाऱ्या पालिका प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

चेंबूरमध्ये रोड क्रमांक 11 वर ही दुर्घटना घडली. या भागातून युनिव्हर्सल हायस्कूलची  बस  जात होती.  शाळेच्या बसमध्ये  12  विद्यार्थी होते. एका बिल्डिंगच्या संरक्षित भिंतीला लागून असलेले हे झाड बसवर कोसळले. बसचे छत एका बाजूने पूर्ण दबले गेले. स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले. त्यानंतर अग्निशमन दल, महानगरपालिका आणि पोलिसांची पथके घटनास्थळी दाखल झाली. मुलांना बाहेर काढण्यात आले. पाच जखमी मुलांना झेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी विहान श्रीवास्तव या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठविण्यात आला. उर्वरित जखमी चारपैकी एका विद्यार्थिनीला उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे. एक विद्यार्थी अतिदक्षता विभागात दाखल आहे.

रस्त्यालगतच्या झाडांची पाहणी

या घटनेनंतर सरकारने मुंबईसह राज्यातील रस्त्यालगत असलेल्या झाडांची तपासणी करण्याचे ठरवले असल्याचे मंत्री दादा भुसे यांनी सांगितले. महापौर रितू तावडे यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे महापौरांनी स्पष्ट केले.

तीन वर्षांत 12 मृत्यू

मागील तीन वर्षांत झाड कोसळून 12 जणांचा मृत्यू झाला आहे तर 125 जण जखमी झाले. एकुलता एक मुलगा गमावला

विहान हा एकुलका एक मुलगा होता. या भयंकर घटनेमुळे विहानच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत गेलेला विहान दुपारी घरी परतत असताना त्याच्यावर काळाने घाला घातला. युनिव्हर्सल शाळेचे शिक्षक व पालकांनाही या दुर्घटनेमुळे मोठा धक्का बसला.

ते चित्र भयावह होतं

पावणेतीनच्या सुमारास मोठा आवाज आला. काय झालं ते बघण्यासाठी घराबाहेर डोकावलं असता स्कूल बसवर झाड पडल्याचे दिसले आणि बसमधील मुलं जिवाच्या आकांताने ओरडत होती. आम्ही धावत बसच्या दिशेने गेलो आणि शक्य तसे मुलांना पटापट बाहेर काढले. पण एक मुलगा झाडाखाली फसला होता. हे चित्र भयावह होते असे प्रत्यक्षदर्शी विमल लोंढे या महिलेने सांगितले.

 उद्यान अधीक्षकावर कारवाई करा -किशोरी पेडणेकर

या घटनेनंतर महापालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.  नागरिकांनी या भागातील झाडांबद्दल तक्रारी केल्या होत्या, मात्र त्याची दखल घेण्यात आलेली नाही. पालिका अधिकाऱ्यांनी पूर्ण दुर्लक्ष केले आहे. ही घटना ज्या भागात घडली त्या भागातील उद्यान अधीक्षकावर कारवाई करावी, अशी मागणी महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी केली.  झाडांचे संरक्षण करणे, झाड मुळासहित उखडून पडू नये यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. पाऊस पडण्याआधी मार्च-एप्रिल महिन्यात या गोष्टी केल्या पाहिजेत. याबाबतची खबरदारी घेतली जात नाही, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.