परफॉर्मिंग लायसन्सवर डान्स बार चालवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा, पोलीस कायद्यात दुरुस्ती करणार; मुख्यमंत्र्यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात डान्स बारवर अनेक निर्बंध असतानाही काही आस्थापनांकडून पोलीस कायद्यांतर्गत परफार्ंमग लायसन्स घेऊन प्रत्यक्षात डान्स बार चालविले जात आहेत. हा गैरप्रकार रोखण्यासाठी पोलीस कायद्यात दुरुस्ती करण्यात येत असून त्यानंतर डान्स बार चालविणाऱया सर्व आस्थापनांना डान्स बार कायद्यांतील सर्व अटी व निर्बंधांचे पालन करणे बंधनकारक राहील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.

ठाणे जिह्यात ऑर्पेस्ट्रा बार उशिरापर्यंत सुरू राहत असल्याबाबत सदस्य नाना पटोले यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात डान्स बारवर नियंत्रण ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या विद्यमान कायद्यातील पळवाटा बंद करण्यासाठी राज्य सरकार महाराष्ट्र पोलीस अधिनियमात दुरुस्ती करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या दुरुस्तीनंतर डान्स बार चालविण्यासाठी महाराष्ट्र डान्स बार कायद्यांतर्गतच परवाना घेणे बंधनकारक राहील. पोलीस कायद्यांतर्गत केवळ सादरीकरण (परफॉर्मिंग लायसन्स) घेऊन डान्स बार चालविण्याची प्रथा यामुळे बंद होईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

…तर परवानाच रद्द होणार

नियमांचे उल्लंघन करणाऱया आस्थापनांवर तसेच संबंधित दोषी पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येत आहे. वारंवार नियमभंग करणाऱया किंवा गुन्हे घडणाऱया आस्थापनांचा परवाना रद्द करण्याची तरतूद करण्याचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे पाठविण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र हॉटेल, उपाहारगृहे आणि मद्यपान कक्ष (बार रूम) यामध्ये अश्लील नृत्यावर प्रतिबंध घालणे व त्यामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण अधिनियमाच्या अंतर्गत ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकाही ध्वनिमुद्रित संगीतावरील नृत्य परवान्यास मंजुरी देण्यात आलेली नसल्याचे सांगितले.