ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर कुलकर्णी यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा


शोधपत्रकारितेच्या माध्यमातून अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना वाचा पह्डणारे ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर कुलकर्णी यांचे आज मुंबईत प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते 61 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने एक सच्चा व अभ्यासू पत्रकार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. कुलकर्णी यांच्या पार्थिवावर बुधवारी शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात मुलगा प्रा. शार्दुल कुलकर्णी आहे.

चंद्रशेखर कुलकर्णी हे होमी भाभा विज्ञान शिक्षण संस्थेचे संस्थापक, शास्त्रज्ञ प्रा. वि. गो. कुलकर्णी यांचे सुपुत्र होते. महाविद्यालयात असतानाच सदर लेखनापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात झाली. पुढे तब्बल तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी मराठीतील अनेक आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये विविध पदांवर काम केले. पत्रकारितेबरोबरच त्यांचे लिखाणही सुरू होते. ‘एक धागा सुताचा’ हे कमला काकोडकर यांचे आत्मचरित्र त्यांनी लिहिले होते. हर्षा भोगले यांच्या ‘आऊट ऑफ बॉक्स’ पुस्तकाचा अनुवाद त्यांनी केला होता. त्याशिवाय ‘द्रष्टा अणुयात्रिक’ आणि ते ‘दोन क्षण सुद्धा’ या पुस्तकांचे संपादन त्यांनी केले होते. उत्कृष्ट पत्रकारितेसाठी त्यांना यमुनाबाई खाडिलकर शोधपत्रकारिता पुरस्काराने गौरवण्यात आले होते. जळगाव येथे 2017 साली झालेल्या विज्ञान साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याचा मान त्यांना मिळाला होता.