
बेग्या पवार या आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याप्रकरणी रिसोड पोलीस ठाण्याच्या प्रमुखासह नऊ पोलिसांना वाशीम जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. तब्बल 15 वर्षांनी हा निकाल लागल्याने पीडिताच्या कुटुंबीयांनी न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली.
वाशीम सत्र न्यायाधीश जयसिंग झपाटे यांनी हा निकाल दिला. यात न्यायालयाने रिसोड पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रमुख महादेव माणिक धांडे यांच्यासह पोलीस कर्मचारी मदन केशव पवार, शिवाजी नामदेव खिल्लारी, पंजाब माणिकराव पाटकर, रमेश सीताराम पवार, प्रकाश हिरालाल तारम, नागोराव भगवान खांडके, अशोक निवृत्ती वैद्य आणि वसंत कणिराम जाधव या नऊ जणांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
या सर्व पोलिसांवर हत्या व अॅट्रॉसिटीचा प्रमुख आरोप होता. सीआयडीकडून 34 दिवस या गुह्याचा तपास झाला. त्यानंतर याचे आरोपपत्र दाखल झाले. दीर्घकाळ याचे साक्षी-पुरावे नोंदवण्याचे काम सुरू होते. अखेर कोठडीतील आरोपीच्या मृत्यूसाठी या पोलिसांना न्यायालयाने दोषी धरले.
काय आहे घटना
रिसोड पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रमुख महादेव धांडे यांच्यासह नऊ पोलीस कर्मचाऱ्यांनी हिंगोली जिह्यातील पारधी वस्तीवर 9 मे 2011 रोजी धाड टाकली होती. या कारवाईत बेग्या पवार या तरुणाला चोरीच्या संशयावरून पोलिसांनी अटक केली. बेग्या पवारचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. गुह्याची कबुली मिळवण्यासाठी पोलिसांनी त्याला मारहाण केली व त्यात बेग्याचा मृत्यू झाल्याचा आरोप झाला. त्यानुसार याची चौकशी झाली.
पोलिसांनी नाहक त्रास दिला
आमच्या मुलाने कोणताही गुन्हा केला नव्हता. केवळ तो पारधी समाजातील असल्यामुळेच पोलिसांनी त्याला या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला, मात्र आजच्या निकालामुळे न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया बेग्या पवारच्या आईवडिलांनी दिली.





























































