महिला डब्यात आता रात्री 9 ते सकाळी 8 वाजेपर्यंत पोलीस पहारा, सुरक्षेसाठी सरकारचा रेल्वेसोबत समन्वय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महिलांच्या सुरक्षेसाठी आता लोकलच्या महिला डब्यात रात्री 9 ते सकाळी 8 पर्यंत पोलीस-गार्ड तैनात ठेवण्यात येणार आहेत. याआधी सकाळी 6 वाजेपर्यंतच ही सुरक्षा तैनात करण्यात येत होती. मात्र विधान परिषदेत सकाळच्या वेळी महिला डब्यात वाढलेल्या गुन्हेगारीवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी ही माहिती दिली. सर्वच स्टेशन परिसरातील सीसीटीव्हींची संख्याही वाढवण्यात येणार आहे. रेल्वे परिसरातील गर्दुल्ल्यांचा उपद्रव, त्यांच्याकडे ड्रग येतेच कुठून याचा शोध घेऊन कार्यवाही करण्यासाठी येत्या 15 दिवसांत रेल्वे पोलीस आयुक्तांशी बैठक घेण्यात येईल. शिवाय गर्दुल्ल्यांचा रेकॉर्ड तपासून 25 दिवसांत कारवाई केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

मुंबई लोकलमध्ये वाढलेली गुन्हेगारी आणि सुरक्षेच्या प्रश्नावर विधान परिषदेत आमदार रवींद्र फाटक यांनी लक्षवेधी सूचना मांडून राज्य सरकार प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजना करीत आहे असा प्रश्न उपस्थित केला. 23 जून रोजी लोकलमध्ये नालासोपाराच्या तरुणाच्या हत्येचा मुद्दा त्यांनी मांडला. यावेळी शिवसेनेचे अॅड. अनिल परब यांनी रेल्वे स्थानक परिसरातील गर्दुल्ल्यांच्या उपद्रवावर सरकार काय उपायोजना करणार, असा प्रश्न उपस्थित करीत रेल्वेत सिव्हिल ड्रेसमध्ये असलेली सुरक्षा व्यवस्था दिसतच नसल्याचे सांगितले. तर काँग्रेसचे भाई जगताप यांनी रेल्वेतून पडून आणि रेल्वे अपघातात दररोज होणाऱ्या दहा मृत्यूंचा प्रश्न मांडला. आमदार राजहंस सिंह यांनीदेखील प्रत्येक रेल्वे डब्यात बंदूकधारी सुरक्षा गार्ड नेमण्याची मागणी केली. तर आमदार चित्रा वाघ यांनी महिला डब्यात असणाऱ्या रात्री 9 ते सकाळी 6 यावेळीतील पोलीस सुरक्षा सकाळी 8 वाजेपर्यंत वाढवण्याची मागणी केली. यावर मंत्री योगेश कदम यांनी सरकारची बाजू स्पष्ट केली.

रेल्वे अपघातात 17 महिन्यांत 2288 मृत्यू

रेल्वे अपघातात वर्ष 2025 पासून मे 2026 अखेर तब्बल 2288 जणांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाले आहेत. यावर काय उपाययोजना करणार, असा सवालही सदस्यांनी उपस्थित केला. यावर रेल्वेची संख्या आणि जास्तीत जास्त लोकल 15 डब्यांच्या करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले.

अशा केल्या उपाययोजना

177 रेल्वे स्थानकांवर 6899 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

रेल्वे पोलिसांच्या मदतीसाठी 2000 होमगार्ड व 150 एमएसएफ मंजूर करण्यात आले असून त्यापैकी अनुकमे 1520 होमगार्ड व 112 एमएसएफ हजर आहेत.

रेल्वे स्थानकांवर गस्त, व्हिसिबल पोलिसिंग करण्यात येते. संशयित व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी तांत्रिक साधने, फेसिअल रेकगनिशन सिस्टम.

प्रत्येक स्टेशनवर संशयित बॅगेची तपासणी. टर्मिनसच्या ठिकाणी बॅगांची स्पॅनरद्वारे तपासणी.

1512 हेल्पलाईन 24 तास कार्यान्वित. यानुसार आलेल्या 1 लाख 56 हजार तक्रारी आल्या असून 53 हजार प्रवाशांना 4 कोटी 36 लाख परत दिले.