
एमटीएनएलचे कर्मचारी असल्याचे भासवून रात्री जमिनीखालील एमटीएनएलची कॉपर केबल चोरून नेणाऱ्या चार जणांच्या टोळीला गुन्हे शाखेने रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून तब्बल एक कोटी पाच हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
बोरिवलीच्या मागाठणे टेलिफोन एक्सचेंजजवळील क्लिरीऑन इमारतीसमोर एमटीएनएलची जमिनीखालील कॉपर केबल चोरून नेण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-१० ला मिळाली. त्यानुसार पथकाने धडक दिली असता त्या ठिकाणी दोन टेम्पोमध्ये कॉपरच्या केबल भरून ठेवल्याचे आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी साहिल साह (२०), अब्दुल शेख (३८), रिझवान मलिक (२८) आणि मो. अफझल खान (३५) या चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३९ लाख ४० हजार किमतीची केबल, दोन टेम्पो, मोबाईल फोन, जेसीबी असा तब्बल एक कोटी पाच हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.





























































