मुंबईला पावसाचा तडाखा आणखी चार दिवस मुसळधार, सांताक्रुझ येथे झाड पडून आठ कामगार जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत सोमवारपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर गुरुवारीही कायम राहिला. सकाळपासून पावसाने जोरदार सुरुवात केली. त्यामुळे शहर आणि उपनगरातील सखल भागात कमी-अधिक प्रमाणात पाणी साचले. त्याचा रेल्वे, रस्ते वाहतुकीवर थोडाफार परिणाम झाला. तर दिवसभरात झाडे, घराचे भाग पडझडीच्या घटना घडल्या. त्यामध्ये सांताक्रुझ (पश्चिम) रहेजा कॉलेज शेजारी खासगी इमारतीच्या आवारात धोकादायक झाडांची पाहणी करताना शेजारील झाड अचानकपणे कोसळून अंगावर पडल्याने आठ कामगार जखमी झाले. त्यांना नजीकच्या नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

नूर आलम (२६), राजेश कुडाळ (५१), विनय कदम (३८), सुलेमान शेख (२८), विनोद भट (४६), देवर्षी सिंह (२८), जगदीश निकम (२८) आणि निलाद तुळे (६७) अशी जखमी कामगारांची नावे आहेत. दरम्यान, हवामान खात्याने सकाळपासून मुंबईसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ दिला होता, मात्र दुपारनंतर हवामानात काहीसा बदल झाला आणि ‘ऑरेंज अलर्ट’ हा ‘यलो अलर्ट’ झाला. त्यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला. मुंबईत सकाळी ८ ते सायंकाळी ६ या कालावधीत शहर भागात २३ मि.मी., पूर्व उपनगर २८ मि.मी. तर पश्चिम उपनगरात – ३२ मि.मी. इतक्या पावसाची नोंद करण्यात आली. तसेच आगामी २४ तासांत ‘यलो अलर्ट’ देण्यात आला असून शहर व उपनगर भागात संततधार, जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच मुंबईत आणि ठाणे जिल्हा परिसरात पडलेल्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांतील पाणीसाठ्यात थोडीफार वाढ झाली.

रिक्षा बुडाली; चालक बचावला
अंधेरी सबवे आज पुन्हा एकदा पाण्याखाली गेला. सबवेवर कंबरभर पाणी तुंबले होते. पाण्याचा प्रवाहही तीव्र होता. यात रिक्षा बुडाली. रिक्षा चालकाला सुखरूपपणे बाहेर काढण्यात आल्याने अनर्थ टळला.

आज समुद्राला उधाण
३ जुलै रोजी मध्यरात्री १ वाजून ३१ मिनिटांनी भरती असून ३.७१ मीटरच्या लाटा येण्याची शक्यता आहे. तसेच दुपारी २ वाजून १८ मिनिटांनी भरती येईल. ४.२८ मीटर उंचीच्या लाटा उसळतील.

९१ झाडे कोसळली
गुरुवारी सकाळपासून कोसळणाऱ्या पावसामुळे शहर भागात १३ ठिकाणी, पूर्व उपनगरात २२ ठिकाणी तर पश्चिम उपनगरांत ५६ ठिकाणी अशा एकूण ९१ ठिकाणी झाडे व झाडाच्या फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या.
विविध ठिकाणी शॉर्टसर्किट होण्याच्या नऊ घटना घडल्या. तर चार ठिकाणी भिंत आणि घराचा भाग पडण्याच्या तक्रारी आल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात आले.

चर्चगेटमध्ये तीन गाड्यांचा चक्काचूर
चर्चगेट रेल्वे स्टेशन परिसरात आज महाकाय झाड कोसळले. झाडाखाली तीन गाड्या दबल्या गेल्या. त्यांच्या खिडक्यांचा काचा फुटून चक्काचूर झाला. ऐन गर्दीच्या वेळी झाड कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांची पळापळ झाली. सुदैवाने झाड पडले तेव्हा गाड्यांमध्ये कोणीही नव्हते. आजूबाजूचे लोक वेळीच दूर गेल्याने मोठा अनर्थ टळला. झाड कोसळल्याची घटना समजताच मुंबई महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि झाड हटवण्याचे काम सुरू केले.