
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रात शिक्षकांना सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने 10 हजार प्रशिक्षक तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी गुगल एज्युकेशनसोबत शिक्षण विभागाने करार केला आहे. या करारानुसार राज्यातील सर्व शिक्षकांना एआयचे प्रशिक्षण मोफत दिले जाणार असल्याची माहिती राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिली.
नियम 92 अन्वये अर्धा तास चर्चेत निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, ज.मो. अभ्यंकर यांनी या चर्चेत सहभाग घेतला. शिक्षकांचे अध्यापन कौशल्य, संवाद कौशल्य, शैक्षणिक नवकल्पना, विद्यार्थीकेंद्रित अध्यापन, संशोधन वृत्ती, पालक व समाजाशी समन्वय अशा बाबींचा टीईटीमध्ये समावेश नसल्याची बाब सदस्यांनी मांडली. मात्र शिक्षकांची नियुक्ती होण्यापूर्वी त्यांनी बीएडसारखे व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण केलेले असते आणि त्यामध्ये या सर्व कौशल्यांचा समावेश असतो. टीईटीचा अभ्यासक्रम हा राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तयार केला असून केंद्र व राज्य शासन त्याच धर्तीवर परीक्षा घेतात, असे राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले.






























































