
एकीकडे गोल करणारा प्रमुख स्ट्रायकर रेड कार्डमुळे मैदानाबाहेर… दुसरीकडे संपूर्ण संघ दहा खेळाडूंवर खेळत होता. पण तरीही सहयजमान अमेरिकेने हार मानली नाही. उलट आक्रमक खेळाचे शानदार प्रदर्शन करत बोस्निया आणि हर्झेगोविनावर 2-0 गोलफरकाने दमदार विजय मिळवत तब्बल 24 वर्षांनंतर विश्वचषकाच्या बाद फेरीतील विजयाची प्रतीक्षा संपवत उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
या वेगवान आणि चुरशीच्या लढतीत पह्लारिन बालोगुन याने मध्यंतरापूर्वी 45 व्या मिनिटाला अमेरिकेला आघाडी मिळवून दिली, मात्र दुसऱया सत्रात तारिक मुहरेमोविच याच्यावर झालेल्या गंभीर फाऊलप्रकरणी त्याला रेड कार्ड दाखवण्यात आले. हा प्रकार अनवधानाने घडल्याचे दिसत असले तरी पंचांनी कठोर निर्णय घेत अमेरिकेला दहा खेळाडूंवर खेळण्यास भाग पाडले, मात्र अमेरिकेने ‘दस’ का दम दाखवत आत्मविश्वास दृढ ठेवला. उलट अखेरच्या टप्प्यात मलिक टिलमन याने 82 व्या मिनिटाला अप्रतिम फ्री-किकवर गोल झळकावत बोस्नियाच्या आशा कायमच्या संपवल्या. अमेरिकेने या विजयातून एकच संदेश दिला आहे.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच अमेरिकेने विजयी इरादा स्पष्ट केला होता. स्टेडियममध्ये घुमणाऱया ‘यू-एस-ए… यू-एस-ए…’ च्या घोषणांमुळे खेळाडूंना अतिरिक्त ऊर्जा मिळाली आणि त्यांनी बोस्नियाच्या बचावफळीवर सातत्याने हल्ले चढवले.
ख्रिश्चन पुलिसिक पुनरागमनानंतर अत्यंत आक्रमक दिसला, तर वेस्टन मॅकेनी, मलिक टिलमन आणि पह्लारिन बालोगुन यांनी सतत बोस्नियाच्या बचावपटूंना धावपळ करायला लावली. मात्र बालोगुन आणि पुलिसिक या दोघांचेही गोल ऑफसाइडमुळे रद्द ठरल्याने अमेरिकेला आणखी मोठा विजय मिळवण्याची संधी हुकली. खेळाडूंची संख्या कमी असली तरी जिद्द कमी नसते. दहा खेळाडूंनी लढून मिळवलेला हा विजय त्यांच्या विश्वचषक स्वप्नांना आणखी बळ देणारा ठरला आहे.
दहा पराभवाची मालिका खंडित
या विजयासह अमेरिकेने युरोपीय संघांविरुद्ध सलग 10 पराभवांची मालिका अखेर खंडित केली. आता अंतिम 16 मध्ये त्यांच्यासमोर पुनरागमनाचे नवे प्रतीक ठरलेला बेल्जियम हा बलाढय़ प्रतिस्पर्धी उभा ठाकणार आहे. बेल्जियमने राऊंड ऑफ 32 मध्ये दोन गोलांनी पिछाडीवरून मुसंडी मारत सेनेगलचा 3-2 असा पराभव केला होता.

























































