
देशात सध्या लोकशाहीसमोर मोठे संकट उभे आहे. कालपर्यंत वोटचोरी केली जात होती, त्यानंतर सीटचोरी केली जाऊ लागली, मग पक्ष चोरी केले जाऊ लागले, आस्थेची चोरी केली जात आहे आणि आता तर सर्वात मोठा धोका उभा ठाकला आहे. हे सरकार आता नागरिकताही चोरी करू लागले आहे, हा गंभीर धोका ओळखा. नागरिकता नाकारून तुमचे मानवी हक्क व अधिकार नाकारले जात आहेत, म्हणून वेळीच सावध व्हा आणि लोकशाही वाचवण्यासाठी आवाज बुलंद करा, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या तेलंगणाच्या प्रभारी मिनाक्षी नटराज यांनी केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने टिळक भवन येथे “लोकशाही वाचवा निर्धार सभा” आयोजित करण्यात आली होती. यावेळी मार्गदर्शन करताना मिनाक्षी नटराजन म्हणाल्या की, माझा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज बेकायदेशीरपणे रद्द केला हा महत्वाचा प्रश्न नाही तर माझा उमेदवारी अर्ज रद्द करण्यासाठी एक मोठे षडयंत्र रचले होते. भाजपाकडे पुरेसे संख्याबळ नसतानाही त्यांनी तिसरा उमेदवार उभा केला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना धमकावण्यात आले. आमच्या तक्रारीची दखलही न घेता निर्णय देण्यात आला. माझ्या उमेदवारीवर आक्षेप घेऊन मला पुरेसा वेळ व संधी दिली नाही पण झारखंडमधील एका उमेदवाराला मात्र त्याच्या अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी २४ तासांचा वेळ दिला, आमचे ऐकूणही घेतले नाही. यानंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला व लोकांनी आवाज उठवला. माझ्यासाठी राज्यसभा नाही तर जनसभा अधिक महत्वाची आहे, असेही नटराजन म्हणाल्या.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यावेळी म्हणाले की, मिनाक्षी नटराजन यांचा राज्यसभेचा अर्ज बेकायदेशीरपणे रद्द करून नटराजन यांच्यावर अन्याय केला असे नाही तर लोकशाहीवरच अन्याय केला आहे. देशात आज करो या मरोची परिस्थिती असून आता स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढण्याची गरज आहे. देशात मनुवादी विरुद्ध संविधानवादी हे दोनच विचार आहेत आणि लोकशाही व संविधान वाचवणे ही आजची सर्वात मोठी गरज आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले..





























































