
गेले चार दिवस सलग कोसळणाऱ्या पावसामुळे संगमेश्वर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगातून कोसळणारा मार्लेश्वर येथील धबधबा ओसंडून वाहायला सुरुवात झाली आहे. निसर्गाचा हा अद्भूत आविष्कार पाहण्यासाठी पर्यटक आणि भाविक मोठी गर्दी करु लागले आहेत. पावसाळ्यात मार्लेश्वर धबधब्याचा वेग प्रचंड असल्याने तो धोकादायक असतो. त्यामुळे देवस्थान कमिटीने या परिसरात जाण्यास मनाई केली आहे.
मार्लेश्वर हे देवस्थान सह्याद्री पर्वतरांगामध्ये उंचावर वसले आहे. दोन्ही बाजूला उंच कडे आणि सभोवताली एका मुख्य धबधब्यासह कोसळणारे अन्य छोटे छोटे धबधबे याचबरोबर ढगांचा पर्वतरांगांजवळ सुरु असणारा खेळ. सतत पावसाचा शिडकावा आणि यामुळे तयार झालेले आल्हाददायक आणि थंडगार वातावरण हे सारे दृष्य विलोभनीय असते. त्यामुळे निसर्गाचा हा नयनरम्य नजारा पाहायला पर्यटकांची गर्दी होत आहे.
पावसाळ्यात मार्लेश्वर धबधब्याची जशी शोभा वाढते तसा तो अत्यंत धोकादायकही बनतो. धबधब्याच्या जवळ असणाऱ्या डोहाची खोली जास्त असल्याने पावसाळ्यात धबधब्याच्या परिसरात जाण्यास बंदी घातली जाते. मार्लेश्वर धबधब्याचा प्रवास खूप लांबून होत असल्याने आणि तो सह्याद्री पर्वतरांगांतून सात टप्प्यात खाली येत असल्याने याच्या पाण्याला कमालीची ओढ आणि वेग असतो. याबरोबरच धबधब्याला जेथे प्रारंभ होतो तेथे पाऊस असेल आणि मार्लेश्वर परिसरात नसेल तर धबधब्याचा प्रवाह अचानक वाढून धोका निर्माण होण्याची शक्यता असते यासाठी मार्लेश्वरच नव्हे तर , कोणत्याही धबधब्याच्या आणि पाण्याच्या ठिकाणी पर्यटकांनी योग्य ती खबरदारी आणि काळजी घेणे गरजेचे असते.
संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर देवस्थान ठिकाणी जाण्यासाठी देवरुख बस स्थानकातून बसची सुविधा उपलब्ध आहे . याबरोबरच संगमेश्वर रोड हे जवळचे रेल्वे स्टेशन असून येथून बसने संगमेश्वर मार्गे देवरुख ते मार्लेश्वर असे जाता येते. संगमेश्वर ते मार्लेश्वर हे अंतर जवळपास ५० किमी एवढे आहे. मार्लेश्वरकडे जाणारा रस्ता वळणावळणांचा असल्याने पर्यटकांनी खाजगी वाहन चालवतांना सतर्क राहणे आणि काळजी घेणे आवश्यक आहे.






























































