
मिऱ्या-नागपूर या मार्गाचे चौपदरीकरणाचे काम करताना सध्या आंबा घाटाचा बहुतांशी मार्ग चार पदरी झाला असला तरी घाटाचा मुख्य भाग अजूनही वळणावळणाचाच आहे. असं असलं तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने यावर्षी आंबा घाटात दरडी कोसळू नयेत म्हणून डोंगर कड्याला मजबूत जाळ्या लावून मार्ग पूर्णतः सुरक्षित केल्यामुळे यावर्षी पावसाळ्यात आंबा घाटातील प्रवास हा सुरक्षितच असणार आहे.
आंबा घाटाची एकूण लांबी बारा किलोमीटर होती. चौपदरीकरण करताना अनेक वळणे काढून टाकल्याने घाटाची लांबी कमी झाली आहे. कळकदरा फाट्याच्या पुढेही चौपदरीकरणाचे काम पोहोचले असल्याने घाटातील प्रवास हा सुरक्षित आणि वेगवान झाला आहे. चौपदरीकरणाचे काम सुरू होण्यापूर्वी आंबा घाटात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. यामुळे हा मार्ग अनेक दिवस बंद ठेवावा लागला होता.
आंबा घाटातील चिकटवणे या ठिकाणाजवळ चौपदरीकरणातील बोगद्यांचे काम केले जाणार असल्याने तेथून पुढील मार्ग पूर्वी होता तसाच आहे. मात्र या मार्गावर डाव्या बाजूकडील डोंगरांच्या कड्यावर उंच उंच आणि मजबूत लोखंडी जाळ्या लावल्यामुळे आता या मार्गावर दरड कोसळण्याची भीती संपुष्टात आली आहे. काही ठिकाणी काळ्या दगडांचे मजबूत बांध उभे केले गेले आहेत. ज्या ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता वाटत होती. अशा सर्वच ठिकाणी मजबूत लोखंडी जाळ्या लावल्या गेल्याने आता आंबा घाटात दरड कोसळण्याचा प्रश्न संपुष्टात आला असून या मार्गावरील प्रवास सुरक्षित बनला आहे.
घाटात कळकदरा फाट्यापासून पुढील मार्गावर डाव्या बाजूने सिमेंट काँक्रीट मध्ये मजबूत संरक्षक भिंती उभारण्यात आल्याने आता वाहनांसाठी ही मोठी सुरक्षेची बाब ठरणार आहे. एखाद्या वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटला तरीही सदर वाहन दरीतून खाली जाण्याचा कोणताही धोका या संरक्षक भिंतीमुळे निर्माण होणार नसल्याचे दिसून येत आहे. याबरोबरच पूर्वी वळणांच्या ठिकाणी असलेले सर्व लहान मोठे खड्डे डांबरीकरणाने भरण्यात आल्याने सदर मार्ग बिनधोक झाला आहे. आंबा घाटातून प्रवास करणे आता हलक्या आणि मालवाहू वाहनांसाठी सोयीचे आणि सुरक्षित बनले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गेले वर्षभर आंबा घाटात सुरक्षेच्या विविध उपाय योजना केल्या जात होत्या. यामध्ये प्रामुख्याने उंच डोंगर कड्यांना मजबूत लोखंडी जाळ्या लावताना कातळाला मोठी छिद्र पाडून त्यामध्ये नटबोल्ट बसवण्यात आले आहेत. या नटबोल्ट मध्ये जाळ्या मजबुतीने बसवल्या गेल्याने यदाकदाचित माती दगडाचा काही भाग डोंगरातून निसटला तरीही तो या जाळीमध्ये सुरक्षित राहणार आहे. या सुरक्षा उपाययोजनामुळे आंबा घाटातील वाहतूक दरडी कोसळून बंद होण्याची भीती आता संपुष्टात आली आहे. याचबरोबर मजबूत उंच आणि जाड अशा सिमेंट काँक्रीटच्या संरक्षक भिंती दरीच्या पूर्ण बाजूने उभारल्याने घाटातील प्रवास पूर्णतः सुरक्षित झाल्याची भावना प्रवासी आणि चालकांनी व्यक्त केली.
सुरक्षेच्या उपायोजनामुळे प्रवास झाला सुरक्षित
सार्वजनिक बांधकाम विभागाने गेले वर्षभर आंबा घाटात केलेल्या विविध उपाययोजनामुळे पावसाळ्यात घाटात दरडी कोसळण्याचा प्रश्न डोंगराला जाळ्या लावल्यामुळे संपुष्टात आला आहे. यापूर्वी आंबा घाटातून जाताना रस्त्याला असलेल्या खड्ड्यामुळे गाडी चालवत असताना मनस्ताप होत होता. पावसाळ्यात घाटातून जाताना दरडी कोसळण्याची भीती होती. आता मात्र सुरक्षेच्या ज्या उपाययोजना केल्या आहेत, त्या नक्कीच अभिनंदनीय असल्याने प्रवासी अथवा मालवाहक वाहनांचा प्रवास सुरक्षित झाला आहे.






























































