
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत गुरुवारी एक दुर्दैवी घटना घडली. साकीनाका परिसरातील खैराणी रोडवर दुरुस्तीचे काम सुरू असलेल्या मॅनहोलमध्ये पडून 60 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
सदर व्यक्तीची ओळख अस्लम इसाक शेख (वय 60) अशी असून ते साकीनाका येथील यादव नगर परिसरात राहणारे होते. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सुमारे 10.45 वाजण्याच्या सुमारास साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खैराणी रोडवर मॅनहोलवरील लोखंडी जाळी (ग्रिल) दुरुस्तीचे काम सुरू होते. यावेळी कामामुळे मॅनहोल उघडे ठेवण्यात आले होते. तेव्हा फोनवर बोलत चाललेल्या अस्लम शेख यांचा तोल जाऊन ते थेट गटारात कोसळले.
घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाला तत्काळ पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे जवान आणि अन्य आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर गटारात पडलेल्या शेख असताना शोध घेण्यासाठी मोठे बचावकार्य हाती घेण्यात आले होते. शेख यांचा युद्धपातळीवर शोध सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.





























































