
मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान अंधेरी पूर्वेतील मरोळ मिलिटरी रोडवर झाड कोसळल्याची घटना घडली. विशेष म्हणजे याच रस्त्यावर बुधवारीही मोठे झाड कोसळून दोन जण जखमी झाले होते आणि अनेक वाहनांचे नुकसान झाले होते. सलग दुसऱ्या दिवशी झाड कोसळल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लोकदर्शन सोसायटीसमोर हे झाड कोसळले. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, सलग दोन दिवस एकाच रस्त्यावर झाडे कोसळल्याने सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
याआधी बुधवारी मुसळधार पावसामुळे मरोळ मिलिटरी रोडवरील एक मोठे झाड उन्मळून पडले होते. झाड रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक वाहनांवर कोसळल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले होते. या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले होते.
घटनेनंतर अग्निशमन दल, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य आणि झाड हटविण्याचे काम हाती घेतले होते. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यासाठीही प्रयत्न करण्यात आले.
स्थानिक रहिवासी इंटेखाब फारुकी यांनी सांगितले की, बुधवारी झालेल्या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले असून चार ते पाच वाहनांचे नुकसान झाले होते.





























































