
मुंबईत पावसाचा जोर वाढत असताना महापालिका प्रशासनाच्या मान्सूनपूर्व कामाचे, नालेसफाईचे दावे उघडे पडले आहेत. दोन दिवसांपूर्वी झाड पडून एका निष्पाप मुलाचा जीव गेला असताना महानगरपालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा आज आणखी एक बळी गेला. अंधेरीत साकीनाका येथे मॅनहोलमध्ये पडून अस्लम शेख (55) नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. रस्त्यावर चालताना अस्लम यांना काळाने गाठले. साडेतीन तासांच्या शोधमोहिमेनंतर अस्लम यांचा मृतदेह आढळला. या घटनेने मुंबईकर हादरले असून तीव्र संताप व्यक्त होत आहे. मुंबईत अनेक ठिकाणी असे मॅनहोल उघडे असून आणखी किती मुंबईकरांचा जीव घेणार, असा सवाल विचारला जात आहे.
मुंबईत पाऊस सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी महापौरांचा दौरा सुरू असताना त्यांच्यासमोरच एक जण मॅनहोलमध्ये पडला होता. त्यानंतर गुरुवारी पुन्हा एकदा मॅनहोलमध्ये पादचारी पडला. अस्लम शेख साकीनाका येथील खैराणी रोड, सन्मान हॉटेलजवळून मोबाईलवर बोलत जात होते. त्याजागी खासगी कंत्राटदाराच्या माणसांनी गटाराचे झाकण उघडे ठेवून काम सुरू केले होते. मात्र काम करताना कोणतीही खबरदारी घेतली नव्हती. मॅनहोलभोवती बॅरिकेड्स लावण्यात आलेले नव्हते. तसेच कर्मचारीही उभे नव्हते. पह्नवर बोलताना अस्लम शेख उघडय़ा मॅनहोलमध्ये पडले. मॅनहोल 20 ते 25 फूट खोल आहे. उपस्थितांनी महानगरपालिका, रेस्क्यू टीमला कळवले. त्यानंतर फायर ब्रिगेडच्या जवानांनी घटनास्थळी येऊन बचावकार्य सुरू केले. पाण्याचा प्रवाह खैराणी रोड ते साकीनाका असा होता. त्यामुळे घटनास्थळापासून 100 मीटरवर असलेल्या चेंबरमध्ये अस्लम शेख अडकल्याचे आढळून आले. मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून अस्लम शेख यांना बाहेर काढले. ते बेशुद्धावस्थेत होते. त्यांना राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याआधीच अस्लम यांचा मृत्यू झाला.
मृताच्या कुटुंबाला 10 लाखांची मदत
या दुर्दैवी घटनेत मृत अस्लम शेख यांच्या कुटुंबीयांना महानगरपालिकेच्या वतीने 10 लाख रुपयांचे अर्थसहाय्य केले जाणार आहे, अशी माहिती महापौर रितू तावडे यांनी दिली.
आठ दिवसांत सर्व मॅनहोलची पाहणी
महापालिका प्रशासनाने मॅनहोलची कामे करताना चारही बाजूंना बॅरिकेड्स लावण्याचे निर्देश पुन्हा एकदा दिले आहेत. तसेच पुढील आठ दिवसांत महानगरपालिका क्षेत्रात असणाऱ्या सर्वे मॅनहोलची 100 टक्के पाहणी करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
फक्त छत्री आणि चपला सापडल्या !
अस्लम शेख मोबाईलवर बोलत या रस्त्यावरून जात असताना उघडय़ा मॅनहोलमध्ये अचानकपणे पडले. ते त्या मॅनहोलमध्ये पडल्यावर तेथे उभ्या असलेल्या कामगाराचे त्याकडे लक्ष गेले. नागरिकांनी, खासगी कर्मचाऱ्यांनी त्याला शोधण्यासाठी मॅनहोलमध्ये शिडी उतरवली, परंतु त्यांना अस्लम शेख यांची फक्त छत्री आणि चपला सापडल्या.
काल झाड, आज मॅनहोल! अमित साटम यांचे संतापजनक वक्तव्य
या घटनेवर विधान भवन परिसरात बोलताना भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी ‘काल झाड, आज मॅनहोल’ असं संतापजनक वक्तव्य केले. हे विधान करताना साटम फिदीफिदी हसत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका होत आहे.
जाळय़ा बसवताना सुरक्षेची काळजी घेतली नाही- आयुक्तांची कबुली
मॅनहोलवर जाळय़ा बसवताना सुरक्षेची काळजी घेतली नाही, अशी कबुली आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिली. भर पावसात मॅनहोलवर जाळय़ा बसवण्याचे काम घ्यायला नको होते. अशा घटनांना प्रशासन जबाबदार असते. पण आयुक्त प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही. अशा घटनांना जे जबाबदार आहेत, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी, असे अश्विनी भिडे म्हणाल्या.
मॅनहोल उघडण्याची गरज नव्हती – महापौर
मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता असताना खैरानी रस्त्यावरील मॅनहोल खुले करण्याचे कोणतेही कारण नव्हते. कामे करताना तेथे किमान संरक्षक उपाययोजना करणे गरजेचे होते. या दुर्घटनेप्रकरणी सात दिवसांत अंतिम चौकशी अहवाल आल्यानंतर दोषींवर आणखी कठोर कारवाई केली जाईल, असे महापौर रितू तावडे म्हणाल्या.
उपमहापौरांनी मागितला आयुक्तांचा राजीनामा
उपमहापौर संजय घाडी यांनी घटनास्थळी जाऊन या घटनेला आयुक्त अश्विनी भिडे जबाबदार असल्याचा आरोप केला. मॅनहोलची झाकणे आणि संरक्षक जाळ्यांबाबत वारंवार प्रशासनाला सांगूनही आवश्यक कार्यवाही करण्यात आली नाही. आयुक्तांनीही सातत्याने दुर्लक्ष केले. त्यामुळे आज एक नाहक बळी गेला. या घटनेची जबाबदारी स्वीकारून आयुक्तांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी घाडी यांनी केली.
विधानसभेत पडसाद
या घटनेचे विधानसभेतही पडसाद उमटले. अशा घटनांमध्ये केवळ निलंबन करून चालणार नाही, तर संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे स्पष्ट मत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज व्यक्त केले. सरकारने यावर निवेदन करण्याचे आदेश राहुल नार्वेकर यांनी दिले.
शिवसैनिक मदतीला धावले।
या घटनेची माहिती मिळताच शिवसेना विभागप्रमुख सोमनाथ सांगळे यांच्यासह स्थानिक शिवसैनिक मदतीला लावले. सांगळे यांनी पालिका कर्मचारी व पोलिसांशी चर्चा करून आवश्यक त्या सूचना केल्या. युवासेना विभाग अधिकारी मनोज (बालाजी) सांगळे हेही यावेळी उपस्थित होते.
उच्चस्तरीय चौकशी होणार
या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी तसेच अशा घटना पुन्हा घडू यासाठी उपाययोजना सुचविण्याकरिता अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे. या समितीत उपआयुक्त (सामान्य प्रशासन), उपआयुक्त (परिमंडळ-7), उपआयुक्त (पायाभूत सुविधा) सदस्य आहेत. चौकशी समितीला सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महापौर, आयुक्तांवर 302चा गुन्हा दाखल करा ः काँग्रेस
कोटय़वधी रुपये खर्च करूनही मुंबईकरांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत. पहिल्या पावसात झाड कोसळून एका निष्पाप चिमुकल्याचा जीव गेला आणि आज साकीनाका येथे उघडय़ा मॅनहोलमध्ये पडून आणखी एका नागरिकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी महापौर व पालिका आयुक्त यांच्यावरच 302 चे गुन्हे दाखल करा, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली.
डॉ. दीपक अमरापूरकर यांचा झाला होता मृत्यू
मुंबईत 29 ऑगस्ट 2017 रोजीही अशी भीषण दुर्घटना घडली होती. प्रभादेवी भागात साचलेल्या पाण्यातून जात असताना प्रख्यात गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला. काही स्थानिक रहिवाशांनी तुंबलेले पाणी घरात शिरू नये म्हणून मॅनहोलचे झाकण उघडल्याचे व त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. याप्रकरणी चार रहिवाशांना अटक झाली होती.
पालिकेने मुंबईकरांना वाऱ्यावर सोडले – किशोरी पेडणेकर
महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मॅनहोलमध्ये पडून पादचाऱ्याचा मृत्यू होणे ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे. कोटय़वधी रुपयांचे बजेट असतानाही मुंबईकरांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत आहे. पालिकेने मुंबईकरांना वाऱ्यावर सोडले आहे, अशी टीका त्यांनी केली. पावसाळ्यापूर्वी 31 मेपर्यंत मॅनहोलची झाकणे बसवणे, जाळ्या बदलणे आणि नाल्यांची स्वच्छता करण्याचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र ही कामे वेळेत पूर्ण झाली नाहीत, असे पेडणेकर म्हणाल्या. दुर्घटना होऊन पाच तास झाले तरी महापौर घटनास्थळी पोहोचल्या नाहीत. या घटनेला प्रशासन जबाबदार असले तरी सत्ताधाऱ्यांच्या प्रशासनावर अंकुश राहिलेला नाही हेच दिसून येतंय. नुसता पाहणी दौरा करून काही होत नाही. प्रत्यक्ष काम करावे लागते, असा टोला पेडणेकर यांनी लगावला.
दुर्घटनांची मालिका, बसवर झाड पडून विद्यार्थ्याचा मृत्यू
तीनच दिवसांपूर्वी चेंबूर येथे शाळेच्या बसवर झाड कोसळून भीषण दुर्घटना घडली. त्यात 11 वर्षीय विहान श्रीवास्तव या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. स्थानिकांनी जुन्या वृक्षांबाबत तक्रारी करूनही त्याची दखल घेण्यात आली नाही.
महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये
हिंदमाता, गांधी मार्केट भागात 24 जून रोजी पाणी भरले होते. त्या भागात महापौर रितू तावडे यांनी पाहणी दौरा केला. यावेळी महापौरांसमोरच सफाई कर्मचारी उघडय़ा मॅनहोलमध्ये पडला.






























































