महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या छत्रछायेखाली होर्डिंग्ज माफिया, वरुण सरदेसाई यांनी उठवला विधानसभेत आवाज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील अनधिकृत व धोकादायक होर्डिंग्जच्या मुद्द्यावरून शिवसेना आमदार वरुण सरदेसाई यांनी विधानसभेत आक्रमक भूमिका घेत आवाज उठवला. दोन वर्षांपूर्वी घडलेल्या घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचा दाखला देतानाच, मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या छत्रछायेखाली मुंबईत होर्डिंग माफिया अजूनही सक्रिय आहेत असे सांगतानाच, होर्डिंगसाठी झाडे कापणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी सरदेसाई यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली.

वांद्रे मतदारसंघात सी-लिंक ते वाकोला या तीन किलोमीटरच्या परिसरातच 171 होर्डिंग्ज आहेत. इतक्या होर्डिंग्जना पालिका परवानगी कशी देते, होर्डिंगसाठी झाडे कापल्याबद्दल वर्षभरात सहा एफआयआर पालिकेने नोंदवले, परंतु त्यावर काहीच कारवाई झालेली नाही। वांद्रे मतदारसंघात फूटपाथ आणि कॅण्टीनवर होर्डिंग लावली गेली आहेत. त्यावर काय कारवाई करणार? ही होर्डिंग्ज लावण्यासाठी सुप्री ऍडव्हर्टायझिंगला महापालिका अधिकाऱ्यांनी होर्डिंग्ज धोरण आल्यानंतरही परवानगी दिली त्यावर काय कारवाई करणार, असा सवाल वरुण सरदेसाई यांनी केला.

पालिकेने होर्डिंग्जचे अधिकार आपल्याकडे घ्यावेत; तालिका अध्यक्षांचे निर्देश

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी होर्डिंग्जसाठी झाडे नव्हेत, तर फांद्या तोडल्या गेल्याची माहिती दिली. त्याला सरदेसाई व अन्य सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला. त्यावर झाडे कापली असतील तर निश्चितच कारवाई करू, असे आश्वासन माधुरी मिसाळ यांनी दिले. महापालिकेने होर्डिंग्जचे अधिकार आपल्या हाती घ्यावेत यासाठी सरकारने पावले उचलावीत, असे निर्देश तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी दिले.