Mumbai manhole tragedy – सहाय्यक आयुक्तांसह चौघांचे निलंबन, कंत्राटदारावर गुन्हा    

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मॅनहोलमध्ये पडून अस्लम शेख यांच्या मृत्यूप्रकरणी ‘एल’ विभागाच्या सहाय्यक आयुक्तांसह चौघांचे निलंबन करण्यात आले. ‘एल’ विभागाचे सहाय्यक आयुक्त धनाजी हेर्लेकर यांच्यासह सहाय्यक/दुय्यम अभियंता (परिरक्षण, एल विभाग) दीपक चौगुले, कनिष्ठ अभियंता (परिरक्षण, एल विभाग)  अभिजित चौगुले, सहाय्यक अभियंता (मलनिस्सारण प्रचालन)  उत्तम पाटील यांना चौकशीसापेक्ष निलंबित करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले.  सुरक्षेच्या नियमांबाबत कामात हलगर्जीपणा करणाऱया संबंधित कंत्राटदारास गुन्हा दाखल करून त्याला ब्लॅक लिस्ट केले जाईल, असे आयुक्त म्हणाल्या.

कारवाईचा पुनर्विचार करण्याची म्युनिसिपल इंजिनीअर्स असोसिएशनची मागणी

चेंबूर येथे मंगळवारी झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी काल दोन रस्ता अभियंता आणि सहाय्यक उद्यान अधीक्षक यांना  निलंबित करण्यात आले आहे. तसेच चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. मात्र प्राथमिक चौकशी पूर्ण होण्याआधीच कर्मचाऱयांना दोषी धरून कारवाई करणे अन्यायकारक आहे.  त्यांना दबावापोटी बळीचा बकरा बनवू नका. या कारवाईचा पुनर्विचार करावा, अशी मागणी म्युनिसिपल इंजिनीअर्स असोसिएशन, मुंबईने केली आहे.