
नागपूरच्या इमामवाडा बस स्थानकावरून थेट शिवाई इलेक्ट्रिक बस चोरून पळवणाऱया एका अट्टल चोरटय़ाला अमरावती पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. विष्णू नीलावर (वय 23) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो तेलंगणाचा रहिवासी आहे.
या कारवाईत पोलिसांनी 1 कोटी 53 लाख रुपये किमतीची शिवाई बस जप्त केली. या आरोपीने एक-दोन नव्हे, तर तेलंगणा, हैदराबाद आणि आंध्र प्रदेशातून तब्बल 20 बसेस चोरल्याची कबुली दिली आहे. 1 जुलै रोजी रात्री चार्ंजगला लावलेली शिवाई बस या चोरटय़ाने चोरली होती. धक्कादायक बाब म्हणजे, तो एकटाच बस चोरून पळून जायचा आणि त्यामधील महागडय़ा बॅटऱया, टायर आणि डिस्क काढून विकायचा. उर्वरित भाग तसाच सोडून द्यायचा. नांदेड बस डेपोतूनही त्याने एक बस चोरल्याचे कबूल केले.




























































