
तालुक्यातील मालुंजे गाव बुधवारी रात्री अक्षरशः दहशतीच्या छायेत गेले. मुरूम वाहतुकीच्या वादातून भाजपचे तालुका सरचिटणीस संदीप भाऊसाहेब घुगे यांच्यावर पिस्तुलातून दोन गोळ्या झाडण्यात आल्या. सोमवारी (दि. 1) रात्री 10च्या सुमारास हा हल्ला करण्यात आला. एवढय़ावरच न थांबता तलवारीच्या जोरावर त्यांच्या घराची तोडफोड करत आरोपींनी दहशत माजवली. या थरारक घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून, याप्रकरणी सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी विशाल हौशीराम खेमनर (अंभोरे), प्रवीण ठकाजी पुणेकर (डिग्रस), सुदर्शन शिवाजी श्रीराम (डिग्रस), तसेच त्यांच्या अन्य तीन अनोळखी साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल खेमनर आणि प्रवीण पुणेकर यांनी संदीप घुगे यांच्यावर पिस्तुलातून दोन गोळ्या झाडल्या. मात्र, सुदैवाने गोळ्या त्यांना न लागता घराच्या दरवाजावर आदळल्या. त्यानंतर सुदर्शन श्रीराम व इतर साथीदारांनी तलवारीने घराचे दरवाजे आणि खिडक्यांची तोडफोड केली. तसेच शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. या हल्ल्यात पिस्तूल आणि तलवारीसारख्या घातक शस्त्र्ाांचा वापर करण्यात आला.
हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे आणि महेश शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2 जुलै रोजी पहाटे गुन्हा नोंदवण्यात आला असून, सहा आरोपी शस्त्र्ाांसह फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली असून, या धाडसी हल्ल्यामुळे संगमनेर तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.




























































