श्रीरामपुरात गँगवॉर; तरुणावर हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime news new

श्रीरामपूर शहरातील पूर्णवादनगर परिसरात आज दुपारी एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याने खळबळ उडाली. शुभम यादव ऊर्फ ‘कल्लू’ या तरुणावर वार करण्यात आले. यात गंभीर जखमी शुभमची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचारांसाठी अहिल्यानगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले.

शुभम यादव याच्यावर सूतगिरणी परिसरातील काही संशयितांनी हल्ला केला. काही महिन्यांपूर्वी सूतगिरणी परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेशी शुभम यादवचे नाव जोडले गेले होते. त्या घटनेचा बदला म्हणून हा हल्ला झाल्याची चर्चा शहरात सुरू आहे. मात्र, या दाव्याला पोलिसांकडून दुजोरा मिळालेला नाही.

दरम्यान, हल्ल्यानंतर परिसरात गोळीबार झाल्याची अफवा वेगाने पसरली. मात्र, प्रत्यक्षात गोळीबार झाला की नाही, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नसून, पोलिसांकडून तपास सुरू आहे. शुभम यादव हा शहरातील एका कुख्यात टोळीशी संबंधित आहे. या घटनेनंतर शहरातील संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
गेल्या काही महिन्यांपासून श्रीरामपूर शहरात गोळीबार, गँगमधील वाद, धारदार शस्त्र्ाांनी हल्ले आणि गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, शहरातील कायदा व सुव्यवस्था ढासळत चालल्याची भावना व्यक्त होत आहे.