Rain Alert – आंबा घाटात दरड कोसळली; रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील एकेरी वाहतूक बंद, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाटात दख्खन ते कळकदारा दरम्यान दरड कोसळल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी ९ ते ९:३० वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून, सुरक्षेचा उपाय म्हणून सध्या या भागातील एकेरी मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. यामुळे महामार्गावरील वाहनांचा वेग मंदावला आहे.

कोसळलेली दरड आकाराने खूप मोठी असून ती चालू वाहतुकीच्या अगदी जवळ येऊन पोहोचली आहे. सुदैवाने, चारपदरी महामार्गाच्या मधोमध असलेल्या लोखंडी कंपाउंडमुळे ही दरड थेट रस्त्यावर आली नाही आणि एक मोठा अनर्थ टळला. मात्र, दरडीचे काही लहान-मोठे दगड रस्त्यावर आले असून, त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

या परिसरात दरड कोसळण्याचे सत्र सुरूच असून, सध्या पावसाचा जोरही वाढताना दिसत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी अत्यंत सावधगिरी बाळगून आणि वाहनांचा वेग मर्यादित ठेवूनच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.