राज्यात पावसाचा जोर कायम, मुंबईसह ठाणे आणि पालघरला ऑरेंज अलर्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी भारतीय हवामान विभागाने (IMD) शुक्रवारी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागांत काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

मुंबईत गुरुवारीही पावसाचा जोर कायम राहिला. 2 जुलै रोजी सकाळी 8 ते 3 जुलै रोजी सकाळी 7 या 24 तासांच्या कालावधीत बेट भागात सरासरी 114 मिमी पावसाची नोंद झाली. तर पूर्व उपनगरात 102 मिमी आणि पश्चिम उपनगरात 109 मिमी पाऊस झाला.

दरम्यान, आज दुपारी 2.18 वाजता 4.28 मीटर उंचीची भरती येण्याची शक्यता असल्याने सखल भागातील नागरिकांनी आणि समुद्रकिनारी जाणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी, असा इशाराही देण्यात आला आहे. मुसळधार पाऊस आणि भरती एकाच वेळी येण्याची शक्यता असल्याने काही ठिकाणी पाणी साचण्याची आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.