
कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या देणगी घोटाळ्याचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणी एसआयटीने सखोल चौकशी सुरू केली असून आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे. या चोरी प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. आता अटक करण्यात आलेल्या आठ आरोपींपैकी पाच जण देणगीच्या नोटांचे बंडल चोरून अत्यंत हुशारीने स्वत:च्या कपड्यांमध्ये आणि सॉक्समध्ये लपवताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत.
राम मंदिरातील विविध दानपेट्यांमध्ये भाविकांनी दान म्हणून टाकलेले पैसे मोजण्यासाठी ट्रस्टने 50 लोकांना कामावर ठेवले होते. पैशांची मोजणी सुरू असताना पाच व्यक्ती नोटांचे बंडले कपड्यांमध्ये लपवताना आणि सॉक्समध्ये कोंबताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत. मंदिराच्या पिलग्रीम फॅसिलिटी सेंटरमधील गेल्या 45 दिवसांच्या सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
दरम्यान, ज्या खासगी एजन्सीमार्फत हे कर्मचारी कामावर ठेवण्यात आले होते, त्यांनी या प्रकरणातून आपले हात झटकले आहेत. आम्ही या कर्मचाऱ्यांची थेट निवड केली नव्हती, तर स्टेट बँक ऑफ इंडियाकडून या नावांची शिफारस करण्यात आली होती, असा दावा या एजन्सीने केला आहे. विशेष म्हणजे मंदिरात गोळा होणारी देणगी याच बँकेत जमा केली जाते. ‘इंडियन एक्सप्रेस‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
80 लाखांची रोकड जप्त
श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने 25 जून रोजी नोंदवलेल्या एफआयआरनंतर अयोध्येच्या पोलिसांनी मोठी कारवाई करत आठ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या घरांवर आणि संबंधित ठिकाणांवर छापे टाकून पोलिसांनी आतापर्यंत सुमारे 80 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. पोलिसांनी अविनाश शुक्ला, लवकुश मिश्रा, अनुकल्प मिश्रा, मनिष कुमार यादव, करुणेश पांडे, रमाशंकर मिश्रा, राम शंकर यादव उर्फ टिन्नू यादव आणि सुभाष श्रीवास्तव यांना अटक केली आहे.
सहा तास चौकशी
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक असलेला राम शंकर यादव उर्फ टिन्नू यादव हा श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे माजी सरचिटणीस चंपत राय यांचा चालक आहे. या वादामुळे चंपत राय देखील संशयाच्या भोवऱ्यात सापडले असून, वाढत्या दबावानंतर त्यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला. याच प्रकरणात एसआयटीच्या पथकाने चंपत राय, गोपाळ राव आणि अनिल मिश्रा या ट्रस्टच्या तीन प्रमुख पदाधिकाऱ्यांची सुमारे 6 तास कसून चौकशी केली आहे.




























































