अयोध्या राम मंदिर देणगी घोटाळा – चोरीचे पैसे लपवण्यासाठी वॉशरूमचा वापर! पोलीस चौकशीत आरोपीची धक्कादायक कबुली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगी घोटाळ्याने देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आठ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना केली आहे. या चौकशीतून आता श्रीराम मंदिरातील देणगी घोटाळ्याबाबत अनेक धागेदोरे समोर येत आहेत. या चौकशीदरम्यान एका आरोपीने धक्कादायक माहिती दिली आहे. चोरी झाल्यानंतर त्याची रक्कम थोड्या वेळासाठी वॉशरूममध्ये लपवून ठेवली जायची आणि त्यानंतर ती बाहेर काढली जात असे, अशी कबुली आरोपीने दिली आहे.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, देणगी घोटाळ्यातील सर्व आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. यापैकी एक आरोपी अविनाश शुक्ला याची मंगळवारी तब्बल दोन तास कसून चौकशी करण्यात आली. ज्यामध्ये त्याने कोट्यवधी रुपयांच्या चोरीची कबुली देत मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेतील आणि दान मोजणी प्रक्रियेतील त्रुटींवर बोट ठेवले आहे.

आरोपी अविनाश शुक्लाने चौकशीत मंदिर ट्रस्टचे विश्वस्त अनिल मिश्रा यांच्या भूमिकेचाही उल्लेख केला. देणगी मोजणी प्रक्रियेत ते महत्त्वाची जबाबदारी सांभाळत असल्याचे अविनाशे सांगितले. दानपेटीच्या मोजणी कक्षाच्या चाव्यांपैकी एक चावी टिन्नू यादवकडे असायची, तर दुसरी चावी बँक कर्मचाऱ्यांकडे असायची. सर्व आरोपींनी संगनमताने आणि अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हा कट रचला होता. एकजण पैसे चोरत असताना इतर आरोपी त्याच्याभोवती घोळका करून त्याला कव्हर द्यायचे. संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लोकेशन माहिती असल्याने आरोपींनी कॅमेऱ्यांची नजर चुकवून चोरी केली आणि सुरुवातीला रक्कम बाथरूममध्ये लपवून ठेवली. ट्रस्टच्या वरिष्ठ व्यक्तींशी जवळीक असल्याने कोणालाही त्यांच्यावर संशय आला नाही.

नियंत्रण कक्षातून कॅमेऱ्यांचे मॉनिटरिंग केले जात असल्याचे अविनाश यांनी सांगितले. चोरी केलेल्या या पैशांचा वापर जमीन आणि घर खरेदी करण्यासाठी करण्यात आल्याचेही समोर आले आहे. आता पोलीस या आरोपींच्या बँक खात्यांची चौकशी करत असून त्यांच्या मालमत्तेची चौकशी करत आहेत. हा प्रकार इतके दिवस कोणाच्याही लक्षात न येता कसा सुरू राहिला आणि यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा शोध घेण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने 13 जून रोजी एका विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली आहे.