
दक्षिण मुंबईतील वाळकेश्वर परिसरात एका इमारतीच्या गॅलरीचा काही भाग कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेत एका ५१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू वाळकेश्वर परिसरातील बाबुलनाथ रोडवर मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. इमारतीचा भाग कोसळल्याचा मोठा आवाज होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. या घटनेची माहिती पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला आणि मुंबई अग्निशमन दलाला 30 जून, 2026 रोजी रात्री 11 वाजून 22 मिनीटांनी देण्यात आली. या भीषण अपघातात संतोष रामचंद्र भारस्कर (51) नावाची व्यक्ती ढिगाऱ्याखाली दाबले गेल्याने गंभीर जखमी झाले. अग्निशमन दलाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्यांना बाहेर काढले आणि जेजे रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात आणण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. महापालिकेच्या आपत्कालीन पथकांनी घटनास्थळी तात्काळ मदतकार्य राबवले असून, बाल्कनी कोसळण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
चेंबूरमध्ये भयंकर दुर्घटना; शाळेच्या बसवर झाड कोसळले, एका विद्यार्थ्याचा मृत्यू! 4 जखमी




























































