विरोधक संपवले की स्वतःच्याच पक्षात विरोधक निर्माण होतात; हा जगाचा इतिहास आहे; राज ठाकरे यांनी भाजपला कडक शब्दात सुनावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

“आजपर्यंत जगात एखाद्या सत्ताधाऱ्याने ज्या वेळेला त्यांचे विरोधक संपवलेले आहेत, त्यावेळी त्यांच्याच पक्षामध्ये विरोधक तयार झालेत आणि त्यांनीच त्यांना संपवलेले आहे. हा जगाचा इतिहास आहे. ही प्रक्रिया भाजपमध्येही सुरू झाली आहे. विरोधक संपवले की तुमच्यात विरोधक निर्माण होतात. आणीबाणीच्या काळातही हेच घडले होते”, अशा कडक शब्दांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फोडाफोडीचे राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला सुनावले. ते ठाण्यात पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, “देशामध्ये जे काही राजकारण सुरू आहे ते खूप घाणेरडे आणि भयानक आहे. याचा फटका भविष्यामध्ये भाजपलाही मिळणार नाही. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणी आलेला नसतो. आपण करत असलेली कृती हा भविष्यातला काय पायंडा पाडतोय याचे भान जर राजकीय पक्षांना, नेत्यांना नसेल तर मला भविष्यातील पिढ्यांची चिंता वाटते. राजकारण येते, जाते. पण आपण महाराष्ट्र, देश आणि राजकारण कुठे नेणार आहोत?”

“महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचे गलिच्छ राजकारण सुरू आहे. उद्या सत्ता गेल्यावर अशाच प्रकारच्या गोष्टींचा भाजपलाही त्रास होईल. त्यावेळी काय कराल? आपण काय करतोय, कुठपर्यंत जातोत आणि कुठपर्यंत जायचे याला काही मर्यादा आहे की नाही?”, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

“प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाही, तर विकले जाणाऱ्यांचा आहे. आता देहविक्रीला हे तयारच असतील, तर गिऱ्हाईक आहेतच. हे घाणेरडे राजकारण सुरू आहे. लोकांमध्ये या गोष्टीचा संताप आहे. आपण पत्त्याचा बंगला करायचो तसा हा उलटा आहे. त्याच्या खालचा पत्ता मोदींचा आहे. तो एकदा सटकला हे सगळे कोसळणार आहे. जे काही आज टिकून आहे ते मोदींवर टिकून आहे. अशा गोष्टींमध्ये तुम्ही जे भयानक राजकारण खेळता हे त्यांनाही अंगाशी येणार आहे”, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

“हे कुणासाठी सुरू आहे? कोण करत आहे? हे अमित शहांचे राजकारण सुरू आहे. शिवसेनेचे 6 खासदार फोडले. ते भाजपमध्ये का नाही गेले? टीएमसीचे 22 खासदार फुटले. वेगळा गट का केला? उद्या जर मला पंतप्रधानपदावर दावा सांगायचा असेल आणि आतमध्ये विरोध झाला तर बाहेरून लोक मतदान करतील किंवा पाठिंबा देतील. दुसऱ्याने दावा सांगितला तर मी हे जे उभे केले ते कुणी सपोर्ट करणार नाहीत. समोरचे विरोधक संपवता तेव्हा विरोधक तुमच्यातच तयार होतात. ते चित्र महाराष्ट्रात आणि देशात अगदी खालपर्यंत तुम्हाला दिसेल. बेधुंद सत्ता ज्यावेळी येते त्यावेळी माणसं अशी वागायला लागतात”, असा टोलाही राज ठाकरे यांनी लगावला.