
मुकुल माधव फाऊंडेशनने आपल्या सीएसआर भागीदार फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या सहकार्याने १८ वे वार्षिक शालेय आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले. त्यात पावस-रत्नागिरी परिसरातील १३ शाळांमधील २,३५५ विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
सन २००८ पासून सुरू असलेला हा उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सातत्याने राबविण्यात येत आहे. दरवर्षी या उपक्रमातून पाच हजाराहून अधिक विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन व पुढील उपचारासाठी सल्ला दिला जातो. मुकुल माधव फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया यांच्या मार्गदर्शनाखाली गेली १८ वर्षे हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. या शिबिरात पुणे, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथील अनुभवी डॉक्टरांनी सहभाग घेतला. ससून रुग्णालय, सिंबायोसिस मेडिकल कॉलेज, एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल, सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज, परकार हॉस्पिटल, इन्फिगो आय हॉस्पिटल, देशपांडे डेंटल हॉस्पिटल आणि श्री डेंटल क्लिनिक येथील डॉक्टरांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली.
बालरोग, नेत्ररोग, दंतचिकित्सा, त्वचारोग, कान-नाक-घसा (ईएनटी) आणि स्त्रीरोग तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांची सविस्तर तपासणी करून आवश्यक त्या विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन केले.यावर्षी प्रत्येक शाळेत किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी आरोग्य व स्वच्छता जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले. महिला स्त्रीरोगतज्ज्ञांनी मुलींना मासिक पाळीदरम्यान घ्यावयाची काळजी, स्वच्छता, योग्य आहार, आरोग्य आणि गैरसमजांबाबत मार्गदर्शन केले. मुलींनीही आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.शिबिरापूर्वी सहभागी शाळांची संमतीपत्रे घेण्यात आली. त्यानंतर फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अनुप करमरकर यांनी प्रत्येक शाळेत जाऊन आरोग्य, स्वच्छता आणि पोषण या विषयांवर जनजागृतीपर मार्गदर्शन केले.






























































