
मोठय़ा प्रमाणावर मासळी मिळाली की एकतर ती स्वस्तात विकावी लागते किंवा फेकून द्यावी लागते. मात्र यापुढे जादा मासळी वाया जाणार नाही. याच मासळीपासून चवदार लोणचं, फिश फिंगर्स, फिश बॉल, फिश कोनचाट आणि बटरफ्लाय कोळंबी असे चवदार व टिकाऊ पदार्थ बनवता येणार आहेत. त्यातून मच्छीमारांच्या खिशात जादा पैसे खुळखुळणार आहेत.
भाईंदरच्या पाली उत्तन येथील मच्छीमार मोठय़ा प्रमाणावर मासळीचा व्यवसाय करतात. या गावांची संपूर्ण अर्थव्यवस्थाच मासळीच्या व्यवसायावर अवलंबून आहे. मासे विक्रीसाठी महिला वर्ग मोठय़ा प्रमाणावर कार्यरत आहे. जादा मासळी मिळाली की त्याचे काय करायचे याची चिंता नेहमीच या महिलांना भेडसावते. या महिलांना त्यांच्याच व्यवसायात अधिक प्रावीण्य मिळावे आणि स्वयंरोजगारासाठी दारे खुली करून द्यावीत यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत केंद्रीय मात्स्येकी औद्योगिक संस्थान यांच्या वतीने पाली उत्तन मच्छीमार सहकारी सोसायटीच्या महिला सभासदांसाठी दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 29 आणि 30 जून या कालावधीत झालेल्या प्रशिक्षण शिबिरास 30 हून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या.
योग्य हाताळणी, प्रक्रिया तंत्रज्ञान
जादा मासळी उपलब्ध झाल्यास तिची योग्य हाताळणी, स्वच्छता आणि प्रक्रिया तंत्रज्ञानाचा वापर करून व्यावसायिकदृष्टय़ा फायदेशीर आणि चविष्ट फिश फिंगर्स, चवदार लोणचं, फिश बॉल, फिश कोनचाट, बटरफ्लाय कोळंबी बनवण्याचे ट्रेनिंग मच्छीमार महिलांना देण्यात आले. या प्रशिक्षणातून आम्ही आर्थिकदृष्टय़ा अधिक स्वयंपूर्ण होऊ असा विश्वास मच्छीमार महिलांनी व्यक्त केला. या वेळी सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ फिशरीज टेक्नॉलॉजीच्या वैज्ञानिक रेहाना राज, सुप्रिया चौथाले, समृद्धी डार्लेकर, सूरज पाटील, प्रियंका बाईत, उत्तन मच्छीमार सहकारी सोसायटीच्या चेअरमन फ्रिडा डिमेलो, सचिव आल्सन निग्रेल, अंबिका कर्तन, लिंटन मुनीस उपस्थित होत्या.



























































