चौदा कोटींच्या फसवणूकप्रकरणी स्वप्नील शिंदेसह दोघांना अटक; नाशिक कारागृहातून आरोपी अहिल्यानगरला वर्ग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अहिल्यानगर शहरातील गाजलेल्या अंकुश चत्तर खून प्रकरणातील मुख्य आरोपी व भाजपचा माजी नगरसेवक स्वप्नील रोहिदास शिंदे याच्यासह दोघांना चौदा कोटींच्या आर्थिक फसवणूकप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. सध्या नाशिक कारागृहात असलेल्या या दोघांना पोलिसांनी आज अटक केली असून, न्यायालयाने या दोघांनाही सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अहिल्यानगर शहरातील डॉ. अनिल आठरे यांची जमीन व्यवहारात चौदा कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी स्वप्नील शिंदे याच्यासह 28 जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात 8 नोव्हेंबर 2025 रोजी गुन्हा दाखल झाला होता. 22 एकर जमिनीचा हा व्यवहार असून, याबाबत डॉ. आठरे यांनी फिर्याद दिली होती. सदरचा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाल्यानंतर पोलीस निरीक्षक शरद गोरडे यानी तपासाची सूत्रे हाती घेतली. यापूर्वी नेवासा तालुक्यातील माजी सरपंच अमोल जाधव याला या गुह्यात पोलिसांनी अटक केली होती. आज स्वप्नील शिंदे व त्याचा साथीदार महेश नारायण कुऱहे या दोघांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. या गुह्यात नाशिक कारागृहातून दोन्ही आरोपींना नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. दोघांना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अडीच वर्षांपूर्वी पाईपलाईन रोड येथे अंकुश चत्तर या तरुणाचा पाठलाग करून सिनेस्टाईल खून झाला होता. राज्यभरात गाजलेल्या या प्रकरणात भाजपचा माजी नगरसेवक स्वप्नील शिंदे हा मुख्य सूत्रधार असल्याचे पुढे आले होते.

या गुह्यात शिंदेसह सुमारे बारा आरोपींना अटक करण्यात आली. स्वप्नील शिंदेवर खून तसेच मोक्काची कारवाई झाली. गेल्या अडीच वर्षांपासून त्याची रवानगी नाशिक कारागृहात करण्यात आलेली आहे. तर फसवणुकीच्या गुह्यात यापूर्वी अटक केलेला अमोल जाधव हा सराईत गुन्हेगार आहे. तर फसवणूक प्रकरणात स्वप्नील शिंदेचा भाऊ सचिन शिंदे याचाही आरोपी म्हणून समावेश आहे.