
म्हसळा तालुक्यातील पाभरे ग्रामपंचायत हद्दीतील चिचोंडे गावात स्मशान शेड नसल्याने उघड्यावरच धो धो पावसात मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. छत्री आणि ताडपत्रीचा आधार घेऊन अग्निसंस्कार पार पाडावे लागत असून मृतदेहांची हेळसांड होत आहे. याबाबत ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप असून तातडीने शेडचे काम पूर्ण करावे अशी मागणी होत आहे.
चिंचोडे येथील यशवंत पोटले यांचे आज निधन झाले. नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत आणला. याचवेळी जोराचा पाऊस सुरू झाला. उघड्यावर असलेल्या स्मशानभूमीला शेड नसल्याने मृतदेह भरपावसात भिजत होता. पाऊस थांबत नसल्याने ग्रामस्थांनी छत्री आणि प्लास्टिकच्या आधाराने भरपावसातच अंत्यसंस्कारापूर्वीचे सर्व विधी पार पाडले. मात्र तासाभरानंतर पाऊस थांबल्यानंतर अग्निसंस्कार करण्यात आले. शेडअभावी मृतदेहाची हेळसांड झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
शेडच्या कामात भ्रष्टाचार
पाभरे ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाची सत्ता आहे. सत्तेतील एका पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील सदस्याने स्मशान शेडचे काम घेतले आहे. मात्र या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसेचे योगेश बोर्ले यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केला होता. तेव्हापासून चिंचोडे येथील स्मशान शेडचे काम लटकले आहे. या सर्व वादात स्मशान शेड नसल्याने मृतदेहांवर उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागत असून पावसात अंत्यसंस्कार करताना सर्वांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.






























































