आलिशान मोटारीतून गुटख्याची तस्करी; तिघांना अटक, श्रीगोंद्यात पोलिसांची कारवाई; 28.88 लाखांचा मुद्देमाल जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत श्रीगोंदा तालुक्यातील गुटखा रॅकेटचा पर्दाफाश केला. आलिशान कारमधून गुटखा व सुगंधी तंबाखूची वाहतूक करून विक्रीसाठी नेण्यात येत असताना पोलिसांनी छापा टाकून तिघांना अटक केली. या कारवाईत 28 लाख 88 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या रॅकेटमधील चौघे आरोपी फरार आहेत.

अमोल रामदास जाधव (वय 35), अनिल रतन कुरुमकर (वय 43) आणि फरहान रेहमान बेपारी (वय 23) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक अनंत सालगुडे, अंमलदार अतुल लोटके, गणेश धोत्रे, शाहिद शेख, मनोज साखरे, प्रशांत राठोड, चंद्रकांत कुसळकर यांचे पोलीस पथक श्रीगोंदा परिसरात गस्त घालत असताना माहितीच्या आधारे ही कारवाई केली.

मुंढेकरवाडी येथे अमोल जाधव हा प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्याच्या घरावर पाळत ठेवण्यात आली. त्यावेळी तिघे मोटारींमध्ये गोण्या भरत असल्याचे दिसले.

चौकशीत अमोल जाधव याने हा व्यवसाय दीपक लोखंडे याच्यासोबत भागीदारीत सुरू असल्याची कबुली दिली. प्रतिबंधित माल जत (जि. सांगली) येथील अप्पू आणि माजीद यांच्याकडून आणल्याचे त्याने सांगितले. तर, फरहान बेपारी याने हा माल शोएब राजू तांबोळी याच्या सांगण्यावरून विक्रीसाठी नेत असल्याचे पोलिसांना सांगितले. दीपक लोखंडे, अप्पू, माजीद आणि शोएब तांबोळी हे चौघेही सध्या फरार असून, त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.

कारवाईदरम्यान पोलिसांनी ‘आरएमडी’, ‘विमल’ पानमसाला, गुटखा आणि ‘व्ही-1’ सुगंधी तंबाखू, दोन मोटारी, रोकड, तीन मोबाईल फोन असा एकूण 28 लाख 88 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस अंमलदार मनोज मोहन साखरे यांनी फिर्याद दिली.