
परळी वैजनाथ येथील औष्णिक विद्युत केंद्रातील 19 वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अचानक बदल्या करण्यात असून त्यांच्या जागी अद्याप नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. महानिर्मिती प्रशासनाने घेतलेल्या या धक्कादायक निर्णयामुळे आधीच अडचणीत असलेल्या या विद्युत प्रकल्पाच्या भवितव्याबद्दल आता पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, रसायनशास्त्रज्ञ आणि सुरक्षा अधिकारी यांसारख्या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या पदांवरील अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश असून त्यांना तडकाफडकी इतर प्रकल्पांत हलवण्यात आले आहे. प्रशासकीय आदेशानुसार या सर्व अधिकाऱ्यांची उरण वायू वीज केंद्र, तसेच भुसावळ, चंद्रपूर, कोराडी, खापरखेडा, पारस, पोफळी, वैतरणा, नाशिक आणि मुंबई येथील विविध प्रकल्पांमध्ये बदली करण्यात आली आहे.
परळी औष्णिक विद्युत केंद्रात सध्या 250 मेगावॉटचे तीन संच कार्यरत आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून येथे सातत्याने वीज निर्मितीतील घट आणि जुन्या यंत्रणांची दुरावस्था यामुळे प्रकल्प आधीच चर्चेत होता. त्यातच गेल्या वर्षीही या केंद्रातून शंभराहून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. आता पुन्हा एकदा रिक्त झालेल्या जागांवर नवीन नियुक्त्या न झाल्याने प्रकल्पाचे भवितव्य काय, या चिंतेने स्थानिक पातळीवर आणि कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संभ्रम पसरला आहे.






























































