
सलग चार दिवस कोसळणाऱ्या पावसाने सर्वत्र थैमान घातले असतानाच आज ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्याला अक्षरशः ‘धो डाला’. आज दिवसभरात ठाणे जिल्ह्यात १७० मिमी, पालघर ९७.७ तर रायगड जिल्ह्यात जवळपास १५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तुफान कोसळणाऱ्या पावसाने नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. ठाणे, नवी मुंबई, बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळा, भाईंदर, वसई-विरारमधील अनेक भागांत पाणी तुंबले. नाले ओव्हरफ्लो होऊन रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. कल्याण, डोंबिवली तसेच दिव्यातील शेकडो चाळींमध्ये पाणी शिरल्याने हाहाकार उडाला.
घरांमध्ये गुडघाभर पाणी तुंबले. पावसाचा सायन-पनवेल महामार्ग, ठाणे-बेलापूर, कल्याण शिळफाटा, घोडबंदर रोडवर ट्रॅफिक कोंडी झाली. ग्रामीण भागातील बाजारपेठांमध्येदेखील पूर आल्याने संपूर्ण जनजीवन ठप्प झाले. काही ठिकाणी वृक्ष कोलमडून विजेच्या तारा तुटल्याने काही काळ वीज पुरवठाही खंडित झाला होता. चार दिवस वरुण राजाने दाखवलेल्या कृपादृष्टीमुळे खपाटीला गेलेली ठाणे, रायगड तसेच पालघर जिल्ह्यातील अनेक धरणे अर्धी भरली असून पाणी कपातीचे संकट टळले आहे.
ठाण्यात २८ ठिकाणी पाणी तुंबले ठाणे : मुसळधार पावसाने ठाणेकरांना अक्षरशः झोडपून काढले. तब्बल २८ ठिकाणी पाणी तुंबल्याने जनजीवन विस्कळीत झाले. साकेत रोड, दिवा पूर्व, दिवा शिळ रोड, डायघर गाव, सिव्हिल हॉस्पिटलसमोर, यशोधन नगर, कोपरी कॉलनी, साबेगाव, कोर्टनाका, दिवा आगासन रोड, मुंब्रा, नौपाडा, कामगार हॉस्पिटल, फ्लॉवर व्हॅली या ठिकाणी पाणी तुंबले होते. १९ झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या.
घराघरांत पाणी शिरले, झाडे कोसळली, पालघर जिल्ह्यात वाहतूककोंडी
पालघर : मनोर मस्तान नाका, विक्रमगड फाटा, वरई फाटा या ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. वाघोबा घाटात झाड कोसळल्याने वाहतूक बंद ठेवावी लागली. सूर्या नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. जलसार, टेंभी, खोडावे व जलसार जेट्टीकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेल्याने अनेक भागांचा संपर्क तुटला.
चार दिवसांत धरणे अर्धी भरली
भाईंदरमध्ये मुसळधार पावसामुळे मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर पाणी तुंबल्याने वाहतूक ठप्प झाली होती.
भिवंडीतील म्हाडा कॉलनी, संगमपाडा, ईदगाह झोपडपट्टी या भागांत पाणी शिरले. काकुबाई चाळ, पद्मानगर, अंबिका नगर यांसह बाजारपेठांमध्ये पूर आला.
शहापूर तालुक्यातील फुगाळे-टोकरखांड रस्ता पाण्याखाली गेल्याने परिसरातील दोन हजार नागरिकांचा संपर्क तुटला.
वालधुनी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने अंबरनाथ येथील शिव मंदिरात जाण्यास नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे.
वाडा-मनोर मार्गावरील आमगाव येथे पाणी तुंबल्याने हा मार्ग ठप्प झाला होता.
कल्याण-शिळफाटा मार्गावर यामुळे वाहतूककोंडी होऊन चाकरमान्यांचे हाल झाले. कल्याण पश्चिमेतही अनेक भागांत दुकाने तसेच घरांमध्ये पाणी शिरले.
कुंडलिका, अंबा नद्या दुथडी
अलिबाग : संततधार पावसामुळे कुंडलिका, अंबा, सावित्री, काळ नद्या दुथडी भरून वाहत असून अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती आहे. जिल्ह्यातील २८ धरणात सरासरी ५३.६८ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. पोलादपूरमध्ये सर्वाधिक २२२ मिमी पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल महाड १६२, माणगाव १०२, सुधागड ११६ तसेच अन्य तालुक्यांमध्येही धुवाधार पाऊस सुरू आहे.





























































