
आयर्लंडनंतर श्रेयस अय्यरच्या सेनेचे पराभवाचेच पाढे इंग्लंडमध्येही पाहायला मिळाले. हिंदुस्थानने 190 धावा करत इंग्लंडला कोंडीत पकडले होते. पण हिंदुस्थानसाठी 17 वे षटक धोक्याचे ठरले. इंग्लंडच्या विजयाच्या नायक ठरलेल्या जेकब बेथेलने या षटकात 29 धावा वेचत संघाचा विजय सुकर ठरला. बेथेलने यावेळी 46 चेंडूंत पाच चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद 76 धावांची मॅचविनिंग खेळी साकारली आणि संघाला चार विकेट्स राखून विजय मिळवून दिला. पण वैभव सूर्यवंशीचे पदार्पण या सामन्यात चर्चेचा विषय ठरला.
वैभव सूर्यवंशीने पदार्पणातच संघाला झोकात सुरुवात करून दिली. वैभवने जोफ्रा आर्चरच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारत आपले इरादे स्पष्ट केले. त्यानंतर जोश टंगच्याही पहिल्याच चेंडूवर गगनभेदी षटकार लगावला. पण वैभवची खेळी ही क्षणभंगूर ठरली. त्याने 10 चेंडूंत 14 धावा केल्या. वैभव बाद झाल्यावर अभिषेक शर्मा (43) आणि ईशान किशन (49) या डावखुऱयांनी संघाची धावगती चांगलीच वाढवली. कर्णधार श्रेयस अय्यरने 37 धावांची भर घातली. अखेरच्या षटकांमध्ये तिलक वर्माने दमदार फटकेबाजी केली. त्याने 11 चेंडूंत नाबाद 24 धावा केल्या. त्यामुळे हिंदुस्थानला 190 धावांपर्यंत पोहोचता आले.
इंग्लंडला पहिल्याच षटकात अर्शदीप सिंगने दुहेरी धक्के दिले. त्यामुळे त्यांची 2 बाद 1 अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर जेकब बेथेलने इंग्लंडचा किल्ला चांगलाच लढवला. बेथेलला कर्णधार हॅरी ब्रुक्स आणि टॉम बँटन यांनी प्रत्येकी 39 धावा करत चांगली साथ दिली. पण बेथेलने रवी बिष्णोईच्या 17 व्या षटकात तीन षटकार आणि एका षटकारासह संघाला 29 धावा फटकावून दिल्या आणि तिथेच हा सामना इंग्लंडच्या बाजूने फिरला.
संक्षिप्त धावफलक
हिंदुस्थान – 20 षटकांत 7 बाद 190 (ईशान किशन 49, अभिषेक शर्मा 43; सॅम करण 3/33) पराभूत वि. इंग्लंड – 19 षटकांत 6 बाद 191 (जेकब बेथेल नाबाद 76; अर्शदीप सिंग 3/40).


























































