
<<डॉ. संजय गायकवाड>>
लोहगड किल्ल्यावर झालेला केतनचा मृत्यू हा अपघात नसून खून असल्याचे समोर आल्याने सबंध राज्यात खळबळ उडाली आहे. त्याच्या होणाऱ्या पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने केतनचा काटा काढल्याची कहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला साजेसी आहे. मानसशास्रीयदृष्टय़ा विचार करता हा सायकोपॅथीचा प्रकार असल्याचे दिसते. या प्रकरणामुळे आजच्या तरुण पिढीच्या बदलत्या मानसिकतेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवाल या तरुणाच्या मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. सुरुवातीला अपघात वाटणाऱया या प्रकरणाचा खोलात जाऊन तपास केल्यानंतर तो सिया म्हणजेच केतनच्या होणाऱ्या पत्नीकडून केला गेलेला खून असल्याचे सकृतदर्शनी समोर आले आहे. सियाने आपला प्रियकर चेतन याच्या मदतीने हे दुष्कृत्य घडवून आणल्याचे पोलीस तपासातून पुढे आले आहे. अद्याप या प्रकरणात दोषनिश्चिती झालेली नसली तरी समोर येणारे तपशील कोणाही सामान्य व्यक्तीला हादरवून टाकणारे आहेत. या प्रकरणामुळे आजच्या तरुण पिढीच्या बदलत्या मानसिकतेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
वडिलांनी नवरा मुलगा पसंत करायचा आणि मुलींनी हो म्हणायचे असा एक काळ समाजाने अनुभवलेला आहे. स्रियांना मतस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, निर्णयाधिकार असतात हे मान्य नसणारी पुरुषप्रधान व्यवस्था आपल्याकडे अनेक वर्षे होती. परंतु गेल्या दोन दशकांमध्ये मुलींच्या शिक्षणाचा पाया रुंदावत गेला आणि त्यांच्या कर्तृत्वाची झलकही सर्वांनी पाहिली, पण इंटरनेट युगातील आजची पिढी ही पूर्वीच्या निकषांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. समाजातील मूल्ये, संस्कार, विचारधारा यांचा आलेख घसरत असताना ही पिढी मोठी झाली आहे. त्यामुळे अशा प्रकरणांचा मानसशास्रीयदृष्टय़ा विचार करताना बदललेले सामाजिक परिदृश्य लक्षात घेणे गरजेचे आहे.
स्वतच्या होणाऱ्या पतीला केवळ आपल्या प्रेमाच्या आड येतो म्हणून दरीत ढकलून देणे आणि त्याला अपघाताचे रूप देणे, ही घटना आजच्या तरुण पिढीतील गंभीर मानसिक विकृती आणि भावनिक अपरिपक्वता दर्शवणारी एक धोक्याची घंटा आहे. एखाद्या व्यक्तीची हत्या करण्याचा कट रचणे, हत्येनंतर पोलिसांसमोर खोटे अश्रू ढाळणे आणि केलेल्या कृत्याचा कोणताही पश्चात्ताप न होणे, ही लक्षणे अँटी-सोशल पर्सनालिटी डिसऑर्डर किंवा सायकोपॅथीकडे संकेत करतात. यामध्ये व्यक्तीला सामाजिक नियम, कायदे आणि इतरांच्या भावना किंवा हक्कांबद्दल सदर व्यक्तीला कोणतीही पर्वा नसते. दुसऱयाच्या वेदनेची किंवा जिवाची किंमत नसते. केवळ स्वतची इच्छा पूर्ण करण्यासाठी ही माणसे कोणत्याही थराला जाऊ शकतात. स्वतच्या आनंदासाठी इतरांशी खोटे बोलणे, फसवणूक करणे किंवा बनावट ओळख वापरणे यामध्ये त्यांना यत्किंचितही गैर वाटत नाही. सियाला हे लग्न मान्य नव्हते, तर ती घरात ठामपणे नकार देऊ शकली असती किंवा कायदेशीर मदत घेऊ शकली असती. परंतु समस्येवर परिपक्वतेने मार्ग काढण्याऐवजी वाटेतील अडथळाच संपवून टाकणे हा मार्ग निवडला गेला. याला मानसशास्त्रात ‘प्युअर कोपिंग मेकॅनिझम’ म्हणतात. या मनस्थितीमध्ये कठीण प्रसंगात मेंदू योग्य निर्णय घेऊ शकत नाही. आपल्या आवडीच्या गोष्टीसाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार असण्याच्या मानसिकतेला ‘ऑब्सेसिव्ह लव्ह डिसऑर्डर’ म्हटले जाते.
आजच्या पिढीला काही जण ‘मॅगी जनरेशन’ असेही म्हणतात. कारण या पिढीला यश असो, पैसे असो की स्वातंत्र्य, प्रत्येक गोष्ट लगेच हवी असते. इमिजिएट. ती मिळत नाही किंवा जेव्हा त्यांच्या मनाविरुद्ध काही घडते किंवा एखादी अडचण समोर येते, तेव्हा ती सोडवण्यासाठी संयम ठेवण्याऐवजी ती अडचणच मुळातून उपटून टाकण्याची हिंसक प्रवृत्ती वाढताना दिसत आहे. तसेच मुलांना नकार स्वीकारण्याची, पचवण्याची मानसिकताच विकसित होत नाही.
सियाच्या प्रकरणाचा सर्वात मोठा धडा म्हणजे पालकांचा मुलांशी असणारा सुसंवाद वाढायला हवा. आपला विवाह ज्या मुलाशी लावून दिला जात आहे तो मला मान्य नाही, हे मोकळेपणाने आपल्या पालकांना सांगायला हवे असे सियाला का वाटले नाही? तेवढी मोकळीक त्यांच्या कुटुंबात का नव्हती? आपले एखाद्या मुलावर प्रेम आहे हे मुलींना घरामध्ये सांगायला आजही भीती वाटण्यामागे कुटुंबांतर्गत वातावरणात सुसंवादाचा आणि मोकळेपणाचा अभाव हे महत्त्वाचे कारण आहे. ते असते तर आज केतनसारख्या निष्पाप तरुणाचा बळी गेला नसता आणि सियाचे भवितव्यही अंधकारमय झाले नसते.
तरुणांमध्ये वाढत चाललेल्या क्रौर्याच्या मानसिकतेला मनोरंजनविश्वही जबाबदार आहे. आज ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेबसीरिज, चित्रपट पाहिल्यास त्यामध्ये अनैतिक संबंध, हिंसा, नशेबाजपणा यांचा महापूर आलेला दिसतो. तरुण पिढी असे कार्यक्रम, चित्रपट सर्रास पाहत असते आणि बहुतेकदा पालकांना त्याची कल्पनाही नसते, पण सातत्याने अशा मालिका पाहिल्यामुळे विचारप्रक्रियेवर अतिशय नकारात्मक परिणाम होतात. आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिपसारख्या प्रवाहांचा तरुण पिढीवरील वाढता प्रभाव. विवाह संस्था, कुटुंब संस्था यांमुळे भारतीय संस्कृतीची मुळे भक्कम राहिली, पण पश्चिमी जगाच्या अंधानुकरणातून लिव्ह इनसारखे घातक फॅड तरुणाईमध्ये वाढत चालले आहे. त्यातून तयार झालेल्या मानसिकतेचाही परिणाम अशा घटनांच्या रूपाने दिसून येतो.
मागे मॉडेल मारिया सुसाईराज आणि तिचा प्रियकर जेरोम मॅथ्यू यांनी मिळून टीव्ही एक्झिक्युटिव्ह नीरज ग्रोवर याची मारियाच्या घरात चाकूने भोसकून हत्या केली होती. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे लहान तुकडे करून ते जंगलात जाळण्यात आले. एका क्षणाच्या रागातून आणि अनैतिक संबंधातून हे कृत्य घडले होते. अशा अनेक घटना गेल्या काही वर्षांत घडल्या आहेत. याबाबत समाजाला गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. मुला-मुलींचे विवाह ठरवताना बळजबरी करण्याऐवजी मानसोपचारतज्ञांचे किंवा कौटुंबिक समुपदेशकांचे साहाय्य घेण्यात कमीपणा वाटून घेऊ नका. लोहगड हत्याकांड हे तरुणाईच्या ढासळत्या मानसिक स्वास्थ्याचे लक्षण आहे. आपण आताच त्यांच्या भावनिक आरोग्याकडे लक्ष दिले नाही, तर केवळ सोशल मीडियाच्या आभासी जगात जगणारी ही पिढी वास्तवातील नाती आणि मानवी जीवनाची किंमत विसरून जाईल.





























































