
>> दुष्यंत पाटील
[email protected]
स्पॅनिश चित्रकार दिएगो वेलास्केझ याने काढलेले ‘लास मेनिनास’ हे चित्र, स्पेनच्या साम्राज्याच्या एका काळाची सावली या चित्रातून डोकावते.
काही चित्रं गूढ असतात. अशा चित्रांना आपण जितकं बारकाईने पाहतो, आपल्याला तितकी ती जास्त उलगडत जातात. सतराव्या शतकातील ‘लास मेनिनास’ हे चित्र याच प्रकारात मोडणारे. कलेच्या इतिहासातील अतिशय गाजलेले असे हे चित्र स्पॅनिश चित्रकार दिएगो वेलास्केझ याने काढले आहे.
वेलास्केझचा जन्म 1599 मध्ये स्पेनमधल्या सेव्हिल शहरात झाला. तो स्पेनचा राजा ‘फिलीप चौथा’ याच्या दरबारामध्ये राजचित्रकार म्हणून काम करायचा. त्या काळात राजदरबारात चित्रकाराला फक्त कारागिराचा दर्जा मिळायचा. त्याला फारशी सामाजिक प्रतिष्ठा मिळायची नाही. पण वेलास्केझला स्वतची एक वेगळी ओळख निर्माण करायची होती. त्याला ‘नाईटहुड’ हा मानाचा किताब हवा होता. खरंतर हा किताब फक्त उच्च पातळीवरच्या सरदारांना मिळायचा. राजा फिलीप चौथा आणि वेलास्केझ यांची मैत्री इतकी घट्ट होती की, राजाने आपल्या महालात वेलास्केझला एक खाजगी स्टुडिओ दिला होता. बऱ्याच वेळा राजा तिथे येऊन तासन्तास बसून वेलास्केझला चित्र काढताना पाहायचा. वेलास्केझने आपली संपूर्ण हयात या राजघराण्याची चित्रं काढण्यात घालवली, पण ‘लास मेनिनास’ हे त्याच्या आयुष्यातले सर्वोच्च शिखर ठरले.
‘लास मेनिनास’ हे चित्र काढले गेले तेव्हा राजा फिलीप चौथा याचं वैयक्तिक आयुष्य कठीण काळातून चाललं होते. त्याची पहिली पत्नी आणि मुलगा यांचा मृत्यू झाला होता. गादीला वारस मिळावा म्हणून त्याने आपल्याच भाचीशी लग्न केले होते. या दुसऱया लग्नातून त्यांना एक छोटी मुलगी झाली. ही मुलगी म्हणजे राजकुमारी मार्गारेटा थेरेसा. यावेळी स्पेनच्या साम्राज्याचा वारसदार ठरू शकेल असा कोणताही मुलगा जिवंत नव्हता. त्यामुळे ही छोटी राजकुमारी संपूर्ण स्पेनच्या आशेचा किरण होती. महालातले राजकारण, वारसदार मिळवण्याची धडपड आणि राजाचा एकटेपणा या सगळ्या छटा या चित्रात दडलेल्या आहेत.
लास मेनिनास हे चित्र जवळपास 10 फूट उंच आणि 9 फूट रुंद आहे. चित्र पाहताना आपली नजर सर्वात आधी मध्यभागी असलेल्या पांढऱयाशुभ्र झगमगत्या कपड्यातल्या पाच वर्षांच्या चिमुरड्या राजकुमारीवर पडते. तिच्यावर थेट प्रकाश पडला आहे. चित्रात डाव्या बाजूला आपल्याला एक प्रचंड मोठा कॅनव्हास पाठीमागून दिसतो आणि त्याच्या शेजारी खुद्द चित्रकार ‘दिएगो वेलास्केझ’ हातात ब्रश आणि पॅलेट घेऊन उभा असलेला दिसतो. राजकुमारीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला तिच्या दोन दासी (ज्यांना स्पॅनिश भाषेत ‘मेनिनास’ म्हणतात) तिच्या सेवेत मग्न आहेत. उजव्या कोपऱयात एक शांत बसलेला कुत्रा दिसतो. चित्रात मागच्या बाजूला एक उघडा दरवाजा आहे. तिथून प्रकाश आत येतोय आणि पायऱयांवर एक माणूस उभा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, त्या दरवाजाच्या शेजारी एका आरशात दोन चेहरे चमकताना दिसतात. हे चेहरे आहेत राजा आणि राणी यांचे.
चित्राच्या मध्यभागी उभी असलेली राजकुमारी अतिशय शांत आणि राजेशाही थाटात दिसतीये. तिच्या डाव्या बाजूची दासी गुडघ्यावर बसून राजकुमारीला एका छोट्या लाल मातीच्या भांड्यातून पाणी किंवा पेय देत आहे. उजव्या बाजूची दासी ‘डोना इसाबेल डी वेलास्को’ राजकुमारीला वाकून नमस्कार करताना दिसतीये. या दासींच्या हालचालींवरून राजदरबारातील कडक शिष्टाचार लक्षात येतात. उजव्या कोपऱयात दोन बुटके कलाकार दिसत आहेत. त्या काळात राजवाड्यात राजा-राणी आणि लहान मुलांचे मनोरंजन करण्यासाठी, तसेच त्यांच्यासोबत खेळण्यासाठी अशा लोकांना ठेवण्याची प्रथा होती. चित्रात डावीकडे वेलास्केझ स्वत राजेशाही पोषाखात दिसतोय. तो चित्र रंगवत असला पाहिजे, कारण त्याच्या हातात कुंचला दिसतोय.
चित्रातली खरी गंमत त्यातल्या आरशामध्ये आहे. जर राजा-राणी आरशात दिसत आहेत, याचा अर्थ ते कुठे उभे असतील? ते नेमके तिथे उभे असायला हवेत जिथून आपण चित्र पाहतोय! या एका कल्पनेने वेलास्केझने पूर्ण चित्राचा कोनच बदलून टाकला. थोडीशी कल्पना केल्यावर आपल्याला जाणवते की वेलास्केझ कॅनव्हासवर जे चित्र काढत आहे, ते समोर उभ्या असलेल्या राजा-राणीचे असायला हवे. राजकुमारी आणि तिचे सेवक तिथे राजा-राणीचे चित्र काढणे सुरू असताना त्यांना पाहण्यासाठी आले आहेत. किंवा वेलास्केझ राजकुमारीचं चित्र काढत आहेत आणि राजा-राणी अचानक खोलीत आल्यामुळे सर्व दासी आणि राजकुमारीचे लक्ष दाराकडे (म्हणजेच प्रेक्षकांकडे) गेलंय! म्हणजे आपण एकाच वेळी प्रेक्षकही आहोत आणि राजे-राणीच्या जागेवर उभे राहून इतिहास पाहणारे साक्षीदारही आहोत. नेमक्या याच गोष्टीने हे चित्र अजरामर झाले.



























































