
<<शीतल धनवडे>>
कला, क्रीडा परंपरेला राजाश्रय देणारे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी रोमप्रमाणे निर्माण केलेल्या तत्कालीन पॅलेस थिएटर व सध्याचे ऐतिहासिक संगीतसूर्य केशवराव भोसले नाटय़गृह जळीतकांडानंतर वर्षभरातच ते जसं होतं तसं पुन्हा नव्याने पुनर्निर्माण करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाकडून करण्यात आली. निधीचीही कमतरता पडू न देण्याचा शब्दही दिला गेला. सर्वपक्षीयांनीसुद्धा यासाठी कोटय़वधींचा निधी जमवून दिला; पण आता दोन वर्षे होत आली तरी आतापर्यंत तीस ते चाळीस टक्के काम अपूर्ण आहे. शासनाने जाहीर केलेला पन्नास टक्के निधी अद्याप दिलेला नाही. असे असतानाही या नाटय़गृहाचा पडदा 9 किंवा 15 ऑगस्टला उघडण्याचा घाट घातला जात आहे.
पुनर्निर्माणावेळी छताच्या भिंतीच्या दोन्ही बाजूची मोजमापे वरखाली झाली. आतातर इंग्लंडहून आणलेले त्यावेळचे गर्डर्स कवडीमोल दरात अक्षरशः भंगारात विकल्याचा प्रकार समोर आला आहे. शिवाय मुख्य स्टेजच्या जुन्या लाकडी सागवानाच्या फळ्या सुस्थितीत असताना, त्यासुद्धा गायब होऊन त्याऐवजी चक्क तकलादू प्लायवूड वापरण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे कला, क्रीडा परंपरेला दिलेल्या राजाश्रयाचे एक प्रतीक म्हणजे त्यावेळचे पॅलेस थिएटर आणि सध्याचे संगीतसूर्य केशवराव भोसले नाटय़गृह दुर्दैवाने संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला 8 ऑगस्ट 2024 रोजी रात्री आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
नाटय़गृहाच्या पुनर्बांधणीसाठी शासनाने जाहीर केलेल्या 25 कोटी 10 लाख निधीपैकी 12 कोटी 55 लाख रुपये महापालिकेला मिळाले आहेत. पहिल्या टप्प्यातील 90, दुसऱया टप्प्यातील 80, तर तिसऱया व चौथ्या टप्प्यातील 70 टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगितले जाते. शेवटच्या टप्प्यातील 30 आणि आधीच्या दोन टप्प्यांतील 20 टक्के अशी सध्याची प्रलंबित कामे या महिनाअखेर पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे संबंधित कंपनीच्या अधिकाऱयांकडून सांगितले जात आहे. ऑडिटोरियम, ध्वनी, वातानुकूलन, विद्युत, पार्ंकग, अग्निशमन व्यवस्था, अंतर्गत सजावट तसेच पूर्णत्वाचा दाखला आदी महत्त्वाची कामे अद्याप अपूर्ण आहेत.
कलाकार आणि लोकभावनेमुळे ही ऐतिहासिक वास्तू जशीच्या तशी पूर्ववत करण्याचा शब्द देत, निधीची कमतरता पडू देणार नसल्याची ग्वाही तत्कालीन मुख्यमंत्र्यांसह इतर जबाबदार मंत्री आणि लोकप्रतिनिधींकडून देण्यात आली. तत्कलीन अर्थमंत्री अजित पवार यांनी स्वतः भेट देऊन, कामकाजावरून कडक शब्दांत गांभीर्य पटवून दिले होते. कलाकारांनीही अनेक त्रुटी निदर्शनास आणून दिल्या होत्या. खासदार शाहू महाराज यांना यासाठी नेहमी पाठपुरावा करावा लागला. तरीसुद्धा झालेल्या कामांत अनेक गंभीर त्रुटी झाल्याचे दिसून येत आहे. हेरिटेज कमिटीनेही दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष झाल्याचे आता स्पष्ट होत आहे. खासबाग मैदानातील इंग्लंडहून आणलेले गर्डर्स विमा कंपनीच्या सल्ल्यानुसार भंगारात अवघ्या सात लाखांत विक्री केल्याचीही गंभीर बाब समोर आली आहे. त्यानंतर ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी नाटय़गृहातील मूळ वस्तू ताब्यात घेण्याचे महापौर रुपाराणी निकम यांना आदेश द्यावे लागले.
एसआयटी चौकशी करा – विजय देवणे
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी अत्यंत तळमळीने ही ऐतिहासिक वास्तू निर्माण केली. बाहेरच्या देशातून अत्यंत दर्जेदार तंत्रज्ञ, साहित्य आणले. त्यामुळेच शंभर वर्षांहून अधिक काळ ही वास्तू दिमाखात राहिली; पण दुर्दैवाने जळीतकांडानंतर पुनर्निर्माणात लंडनहून आणलेले लोखंडी खांब (गर्डर्स) भंगारात विकले गेले. सर्वपक्षीयांनी गोळा करून दिलेला कोटय़वधींचा निधी, महापालिकेने स्वनिधीतून केलेला खर्च, राज्य शासनाकडून आलेला निधी तसेच संबंधित ठेकेदारांना देण्यात आलेल्या बिलांची चौकशी होणे गरजेचे आहे. स्थानिक आमदारांच्या कथित टक्केवारीच्या व्हिडीओचा संबंधित ठेकेदार कंपनीशी जोडला जाणारा संबंध पाहाता, या कामात ढपला पाडल्याची टीका होत आहे. त्यामुळे या सर्वच प्रकरणाची विशेष एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी केली आहे.




























































