बेफाम वागणाऱ्यांचा राजीनामा घ्या! राज ठाकरेंकडून अमित साटम लक्ष्य, फडणवीसांच्या मौनावर प्रश्नचिन्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील सत्ताधारी पक्षाचे काही लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांच्या कथित असंवेदनशील वर्तनावर टीका करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अशा लोकप्रतिनिधींचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. लोकांच्या मृत्यूवर हसणाऱ्यांचा राजीनामा घ्या आणि चुकीचे वागणाऱ्यांवर कठोर शासन करून दाखवा, असे आवाहन ठाकरे यांनी फडणवीस यांना केले आहे.

मुंबईत गेल्या काही दिवसांत शालेय बसवर झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर साकीनाका येथे मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या दुःखद घटनांवर भाष्य करताना विधान भवनात भाजपचे आमदार अमित साटम हे हसत असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमात व्हायरल झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज ‘एक्स’ या समाजमाध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात आपल्या भावना व्यक्त करताना ठाकरे यांनी फडणवीस यांनी बाळगलेल्या  मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत आणि संवेदनशील मुख्यमंत्री असल्याची अपेक्षा होती, मात्र अशा घटनांवर त्यांनी साधा खेदही व्यक्त केला नसल्याने त्यांच्या संवेदनशीलतेबाबत शंका निर्माण होते. गेल्या 37 वर्षांच्या  आपल्या राजकीय कारकीर्दीत महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाच्या नेत्याने स्वकियांच्या चुका पाठीशी घातल्याचे पाहिले नसल्याचे सांगत राज ठाकरे यांनी फडणवीस यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आणि प्रमोद महाजन यांच्या काळातील राजकीय परंपरेची त्यांनी आठवण करून दिली.