वेधक – अवघे पाऊणशे वयमान…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

<<अभय मिरजकर>> 

जिद्द असेल तर मार्ग सापडतो ही म्हण आयुष्यात प्रत्यक्ष उतरवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे नरहर मुदगलराव जोशी चाकूरकर. नरहररावांचा जीवनप्रवास म्हणजे प्रपंचाकडून परमार्थाकडे झालेला थक्क करणारा प्रवास आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बालपण गेलेले नरहरराव यांनी कधी माधुकरी मागून, तर कधी वार लावून उदरनिर्वाह करीत शिक्षण घेतले. शिक्षणाची तळमळ पाहून उदगीर येथे वैद्यकीय अधिकारी असलेल्या बाळकृष्ण देशपांडे यांनी त्यांना आपल्या घरी ठेवून घेतले. आईचा सुरेल आवाज आणि मामांच्या संस्कारातून त्यांच्यावर संगीताची आवड निर्माण झाली. अधिकृत शिक्षण न घेताही त्यांनी बासरी वादन आत्मसात केले. केवळ बासरीच नव्हे, तर हार्मोनियम, तबला, बुलबुल तरंग आणि दिमडी ही वाद्येही ते लीलया वाजवू लागले. त्यांच्याकडे 25 विविध प्रकारच्या बासऱयांचा दुर्मिळ संग्रह आहे. त्यांच्या संग्रहात 1,000 हून अधिक कॅसेट्स आणि 550 पेक्षा जास्त सीडी आहेत. अहमदपूर येथे ‘साहित्य संगीत कला अकादमी’ स्थापन करून त्यांनी सलग सात वर्षे कोजागिरी संगीत उत्सव साजरा केला आहे. ‘मुख्याध्यापक’ म्हणून कार्य करताना त्यांनी आपल्या केंद्राला तालुक्यात प्रथम क्रमांकावर नेले. 1991 मध्ये जनगणनेच्या त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रपतींच्या ‘रजत पदकाने’ सन्मानित करण्यात आले.

 

‘वाचाल तर वाचाल’ या म्हणीला नवा अर्थ देत त्यांनी ‘चिकटबुक’ (Scrapbook) उपक्रम राबवला. त्यांच्याकडे आज तब्बल 108 पेक्षा जास्त चिकटबुके आहेत. यामध्ये अध्यात्म, विज्ञान, पाककला, साहित्य, औषधी वनस्पतींपासून ते मराठीच्या 96 लोकभाषांपर्यंतचा दुर्मिळ ज्ञानाचा ठेवा संग्रहित आहे. हा संग्रह म्हणजे एखाद्या चालत्या-बोलत्या विश्वकोशासारखाच आहे. मराठीसह विविध प्रकारच्या ग्रंथांचा संग्रह, पोथ्या, पुराण यांचा संग्रह त्यांनी निर्माण केला आहे. टाकाऊतून टिकाऊ ही संकल्पना त्यांनी स्वत राबवली. आपल्या संग्रहातील 700 पेक्षा अधिक ग्रंथ, पुस्तके त्यांनी आकर्षक पद्धतीने सजवली. मराठी भाषेबद्दल त्यांना सार्थ अभिमान आळगत त्यांनी आरत्या, मंत्र आणि श्लोकांचे उच्चारण शास्त्राsक्त पद्धतीचा आग्रह धरला व त्याचे प्रशिक्षणही दिले. वयाला हरवणारा उत्साह त्यांच्यात दिसतो. त्यांनी स्वतला एक आदर्श शिक्षक, कुशल खेळाडू, संवेदनशील गायक आणि निष्ठावान साधक म्हणून सिद्ध केले आहे.