
प्राचीन इतिहास, कला व संस्कृतीच्या क्षेत्रात संशोधन कार्याचा दोनशे वर्षांचा वारसा असलेल्या मुंबईतील एशियाटिक सोसायटीच्या आज झालेल्या निवडणुकीत भाजपचे माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखालील ‘एशियाटिक टुमारो’ पॅनेलने विजय मिळवला. त्यांनी काँग्रेसचे माजी खासदार कुमार केतकर यांच्या नेतृत्वाखालील ‘सेव्ह एशियाटिक’ पॅनेलचा पराभव केला.
‘एशियाटिक’च्या यंदाच्या निवडणुकीत 2530 पैकी 517 सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. हे आतापर्यंतचे सर्वाधिक मतदान आहे. राजकीय रंग चढलेल्या या निवडणुकीत प्रमुख लढत केतकर आणि सहस्रबुद्धे यांच्या पॅनेलमध्ये झाली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सहस्रबुद्धे यांनी विजय मिळवला. त्यांना 349 मते मिळाली, तर केतकर यांना 147 मते मिळाली.
‘एशियाटिक’सारख्या प्रतिष्ठत संस्थेवर ताबा मिळवण्यासाठी भाजपचे गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू होते. मधल्या काळात एकगठ्ठा सदस्य नोंदणीमुळे वाद निर्माण झाला होता. ‘सेव्ह एशियाटिक’ पॅनेलने यास आक्षेप घेतला होता. भाजप, आरएसएसच्या कार्यकर्त्यांची नोंदणी झाल्याचा ओराप करण्यात आला होता. या वादातून ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. धर्मादाय आयुक्तांनी नेमलेले निवडणूक निर्णय अधिकारी के. डी. तळोकर यांच्या देखरेखेखाली अखेर आज ही निवडणूक झाली. मतदानासाठी 27 सप्टेंबर 2025 पर्यंतच्या सदस्यांना पात्र धरण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, माजी आमदार भारती लव्हेकर, लोकायुक्त न्या. विद्यासागर कानडे, प्रकाशक रामदास भटकळ आदींनी मतदानाचा हक्क बजावला.
कुमार केतकर यांचा आक्षेप
नियमानुसार ‘एशियाटिक सोसायटी’ सदस्यत्व कार्ड असल्याशिवाय मतदान करण्याची परवानगी नाही. तरीही वैध ओळखपत्र नसलेल्या काही सदस्यांना मतदान करू देण्यात आले. या अनियमिततेला कुमार केतकर यांनी तीव्र आक्षेप घेतला. भाजपच्या 25 ते 30 कार्यकर्त्यांची मिटिंग ‘एशियाटिक’च्या पहिल्या मजल्यावर घेण्यात आली. नियमानुसार सदस्य नसलेल्या कार्यकर्त्यांनी लायब्ररीच्या वास्तूमध्ये बैठक घेणे हा आचारसंहितेचा भंग आहे, याकडे ‘सेव्ह एशियाटिक’च्या सदस्यांनी लक्ष वेधले.
दिमतीला ‘लोढा फाऊंडेशन’च्या गाड्या
‘एशियाटिक’च्या निवडणुकीसाठी भाजपने संपूर्ण यंत्रणा कामाला लावली होती. सहस्रबुद्धे यांच्या पॅनेलकडून मतदारांची ने-आण करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या ‘लोढा फाऊंडेशन’च्या गाडय़ा त्यासाठी धावाधाव करत होत्या. त्यांनी नवमतदारांना मोठ्या प्रमाणात मतदानासाठी उतरवले. ओळखपत्र असूनही मतदार यादीत नाव नसल्याने अनेक सभासदांना मतदान करता आले नाही. दिवसभर सुरू असलेल्या पावसाचाही मतदानाला फटका बसला.



























































