आम्ही खूप दयाळू आहोत, म्हणून इराणला आठवड्याची सुट्टी दिली! खामेनींच्या अंत्यसंस्कारावरून डोनाल्ड ट्रम्प यांचा टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा अंतिम प्रवास शनिवार 4 जुलैपासून सुरू झाला. 9 जुलै रोजी इराणच्या मशहाद शहरात इमाम रेझा यांच्या दर्ग्याजवळ संपूर्ण शासकीय इतमामात खामेनी यांचा दफनविधी पार पडेल. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला खोचक टोला लगावला आहे. आम्ही खूप दयाळू आहोत, म्हणून इराणला खामेनी यांच्या अंत्यसंस्कारासाठी आठवडाभराची सुट्टी दिली आहे, असे ट्रम्प म्हणाले. अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनाच्या 250 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

साऊथ डकोटा येथील ऐतिहासिक माउंट रशमोर’येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, आम्ही इराणची पुरती दैना उडवली आहे. आता ते आमच्याशी तडजोड करण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत. आम्ही सध्या त्यांना त्यांच्या नेत्याच्या अंत्यसंस्कारासाठी एक आठवडा दिला आहे, कारण आम्ही दयाळू आहोत. ट्रम्प यांच्या विधानाला उपस्थित अमेरिकन नागरिकांनी टाळ्या वाजवत दाद दिली.

एकच युद्ध 38 वेळा संपवल्याबद्दल ट्रम्प यांना नोबेल द्या! बायडेन यांच्या मुलाने उडवली खिल्ली

अयातुल्ला अली खामेनी यांचा 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यात मृत्यू झाला होता. या हल्ल्यात खामेनी यांच्यासह त्यांची मुलगी, जावई आणि नातवंडही मारले गेले होते. इस्लामिक परंपरेनुसार मृत्यूनंतर 24 तासांच्या आत दफनविधी करणे आवश्यक असते. मात्र, अमेरिका-इस्रायलसोबत सुरू असलेल्या तीव्र युद्धामुळे आणि सुरक्षेच्या कारणास्तव इराणला हा अंत्यसंस्कार पुढे ढकलावा लागला होता. गेल्या महिन्यात दोन्ही देशांमध्ये शांतता करार झाल्यानंतर आता अखेर खामेनी यांच्या अंत्यसंस्काराला सुरुवात झाली आहे.

खामेनींच्या अंत्यसंस्कारावेळी हल्ला केला तर याद राखा, इराणचा अमेरिका आणि इस्रायलला कडक इशारा

शुक्रवारपासून तेहरानमधील ग्रँड मोसल्ला येथे खामेनी यांच्या आठवडाभर चालणाऱ्या शासकीय अंत्यसंस्काराला सुरुवात झाली. हजारो इराणी नागरिक काळे कपडे परिधान करून आपल्या सर्वोच्च नेत्याला निरोप देण्यासाठी जमा झाले होते. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान, संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बगेर गालिबाफ आणि परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्यासह अनेक बडे लष्करी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

तेहरानमधील विधींनंतर खामेनी यांचे पार्थिव कोम या पवित्र शहरात नेले जाईल. यानंतर त्यांचे पार्थिव इराक मधील नजाफ आणि कर्बला या शिया धर्मीयांच्या पवित्र शहरांमध्ये दर्शनासाठी नेण्यात येईल. 9 जुलै रोजी इराणच्या मशहाद शहरात इमाम रेझा यांच्या दर्ग्याजवळ संपूर्ण शासकीय इतमामात त्यांचा दफनविधी पार पडेल. या अंत्यसंस्कारासाठी हिंदुस्थान, पाकिस्तान, रशिया आणि चीन या देशांची उच्चस्तरीय शिष्टमंडळे इराणमध्ये दाखल झाली आहेत.