
मुंबईतील साकीनाका परिसरात उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच कल्याण-डोंबिवलीतही महापालिकेच्या मुख्यालयाजवळच चेंबर सताड उघडे असल्याचे समोर आले आहे. या चेंबरमध्ये पडल्यास एखाद्या पादचाऱ्याचा बळी जाण्याची भीती आहे. मात्र केडीएमसी मुख्यालयाच्या दारातच चेंबरची ही अवस्था असेल तर अन्य भागांतील चेंबरविषयी न बोललेलेच बरे, असा संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या फूटपाथवरून चालताना कल्याण-डोंबिवलीकरांवर उघडा डोळे, बघा नीट असे म्हणण्याची वेळ आली आहे.
पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचत असल्याने उघडे चेंबर दिसून येत नाहीत. त्यामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांचा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कल्याण पश्चिमेतील स्वामी सहजानंद परिसरात अनेक चेंबर उघड्या अवस्थेत असल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या मार्गावरून दररोज शेकडो विद्यार्थी, पालक आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये जा होत असल्याने महापालिका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन उघड्या चेंबरची दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
-…तर अधिकारी जबाबदारी स्वीकारणार का?
शहरातील ज्या ठिकाणी मॅनहोलची झाकणे नाहीत किंवा चेंबर उघडे आहेत, त्या सर्व ठिकाणी त्वरित दुरुस्ती करण्यात यावी. तसेच नागरिकांनी ऑनलाइन माध्यमातून केलेल्या तक्रारींचाही तत्काळ निपटारा करावा. पालिकेने स्थापन केलेला आपत्ती व्यवस्थापन विभाग पावसाळ्यात अधिक सक्रिय होणे गरजेचे आहे. दुर्घटना घडण्यापूर्वी उपाययोजना करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. निष्काळजीपणामुळे भविष्यात कोणत्याही नागरिकाचा जीव गेला तर पालिका अधिकारी जबाबदारी स्वीकारणार का, असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पालिकेतील गटनेते उमेश बोरगावकर यांनी उपस्थित केला आहे.





























































