मराठवाड्यात पावसाचे 8 बळी; 181 जनावरे दगावली, 484 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठवाडा विभागात पावसाळी हंगामाच्या प्रारंभीच बळीराजावर नैसर्गिक संकट कोसळले आहे. वादळी वारा, वीज कोसळून आणि घराची भिंत अंगावर पडल्याने अशा वेगवेगळ्या घटनांत ८ जणांचे बळी गेले आहेत. १८१ जनावरे दगावली असून, शेती पिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार विभागात ४८४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

पावसाळी हंगाम सुरू होऊन महिना लोटला असून, खरीप पेरणीसाठी आवश्यक असलेला पाऊस निर्धारित कालावधीत होऊ शकला नाही. त्यामुळे खरीपाची पेरणी शेतकऱ्यांना वेळेत करता आली नाही. असे असताना वादळी वारे, वीज कोसळणे आणि घराची भिंत कोसळण्याच्या घटना मराठवाड्यात घडल्या आहेत. या नैसर्गिक संकटात आतापर्यंत ८ जणांचे बळी गेले आहेत. यामध्ये भरत संभाजी कदम, रा. वायफना, जि. नांदेड, शेख रशीद शेख मुक्रम (११) रा. चिखली, गुणवंत लक्ष्मण किनाके (३८), रा. दगडी मं, सर्जेराव देवराव खराते या चौघांचा वीज कोसळून मृत्यू झाला असून, घरावरची पत्रे उडून आणि भिंत कोसळून दीपाली विजयराव नंदगे (१०) रा. इंदेवाडी, ताराचंद जिनवाल (४५), अनिकेत जिनवाल (१३) यांचा मृत्यू झाला आहे. शिवाय जिंतूर तालुक्यातील आडगाव बाजार येथील मंगलबाई शेषराव खंडागळे (६५) या पुरात वाहून गेल्या आहेत.

मराठवाडा विभागावर नैसर्गिक संकटांची मालिका सुरू असून, या पावसाळी हंगामात महिनाभराच्या कालावधीत अतिवृष्टी आणि ढगफुटीसारख्या पावसाचा फटका पशुपालकांना बसला असून, लहान मोठी अशी १८१ जनावरे दगावली आहेत. शेती पिकांचेही नुकसान झाले आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार विभागातील ४८४.४५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये फळपिकांची प्रचंड हानी झाली आहे. ४५६.७० हेक्टरवरील फळपिकांना हानी पोहचली असून, २७.७५ हेक्टर क्षेत्रावरील बागायती पिकांचे नुकसान झाले आहे.