
राजधानी दिल्लीत चार दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर आता गुजरात आणि मध्य प्रदेशातून ‘जैश-ए-मोहम्मद’च्या आठ दहशतवाद्यांना गुजरात एटीएसने अटक केली आहे. हे दहशतवादी गुजरातमध्ये ‘जैश’चे नेटवर्क सक्रिय करण्यासाठी काम करत होते. देशात मोठे दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा त्यांचा कट होता.
गुजरात एटीएसच्या अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, सात दहशतवाद्यांना गुजरातमधून, तर एकाला मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी अहमद गाजीवाला (19), मुदस्सीर गाजीवाला (22), इब्राहिम गाघा (30) हे गुजरातच्या बनासकांठा जिह्यातील रहिवासी आहेत.
झकारिया गाघा (21), मुफ्ती दौवा (40) आणि मुहम्मद शेरा (21) हे पाटण आणि अब्दुल सावदी (22) हा नवसारी जिह्यातील रहिवासी आहे. बिलाल गाघा (18) हा मध्य प्रदेशातील रहिवासी आहे. जैश-ए-मोहम्मदने या दहशतवाद्यांना गुजरातमध्ये तरुणांची भरती करण्याचे काम दिले होते. त्यातून एक सक्रिय नेटवर्क उभारून दहशतवादी कारवाया करण्याची योजना होती.
एटीएसने त्यांची चौकशी सुरू केली असून, या दहशतवाद्यांनी कुठे कुठे हल्ला करण्याची तयारी केली होती, त्यांच्या नेटवर्कचा विस्तार कुठे कुठे झाला आहे, पाकिस्तानात ते कोणाच्या संपका&त होते इत्यादींबाबत तपास करण्यात येत आहे.
चार दहशतवाद्यांना दिल्लीतून अटक
दिल्ली पोलिसांनी गुरुवारी ‘आयएसआय’शी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक केली. त्यांनी दिल्लीत महत्त्वाची धार्मिक स्थळे आणि पोलीस ठाण्यांची रेकी केली होती. या ठिकाणी गोळीबार करण्याचे टास्क एका दहशतवाद्याला देण्यात आले होते. याशिवाय दिल्लीत दहशतवादी हल्ले घडविण्याचा कट होता.






























































